
डोंबिवली एमआयडीसीत गॅसवाहक पाईपलाईन फुटली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात बुधवारी (ता. ३) दुपारी अचानक घरगुती गॅसचा पुरवठा करणारी गॅसची पाईपलाईन फुटली. रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. गॅस पाईपलाईन फुटल्याची बाब एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ याची माहिती महानगर गॅस कंपनीला दिली असता गॅसपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
एमआयडीसीच्या निवासी विभागात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे खोदकाम करताना ठेकेदार जातीने लक्ष देत नसल्याने कामगारांकडून कामाच्या ठिकाणी पाणी वितरण करणाऱ्या पाईपलाईन, स्ट्रिट लाईटसाठी जोडलेल्या इलेक्ट्रिकल केबल तटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्यांची कामे सुरू असताना खोदकामावेळी प्लॉट नं. आरएच ३६ या एकदंत सोसायटीसमोर महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन तुटली. त्यामुळे पाईपमधून निघालेला गॅस बाहेर पडून सर्वत्र वास पसरला. ही बाब संजय चव्हाण व सचिन माने या जागरूक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महानगर गॅस कंपनीला याची माहिती देताच कर्मचाऱ्यांनी पाईपलाईनचा गॅसपुरवठा बंद केला. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.