
शिवसेना शाखेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : ऐनवेळी कैची मिळत नसल्याने चक्क रामपुरी चाकूने फीत कापून उद्घाटन करण्यात आलेली उल्हासनगरातील लालचक्की विभाग शिवसेना शाखा ५० वर्षांची झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या उपस्थितीत या शाखेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या शाखेच्या स्थापनेसाठी कॉलेजच्या तीन तरुणांचा मोठा हातभार आहे. १९७३ मध्ये दिलीप मालवणकर, राजू परब व विलास पवार हे चांदीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना टागोर सोसायटीच्या गल्लीत एक सूचना फलक लावला होता. त्यावर शिवसेनेशी संबंधित विचार, माहिती व व्यंगचित्रं काढत काढत शाखा स्थापन करण्याचा विचार या त्रिकुटाने केला. वर्षभरात बाळकृष्ण माने, शरद माने, जोसेफ कोलगे मास्तर, सुभाष वैद्य, बळीराम नईबागकर, विलास देशपांडे, रवींद्र महाजन, विवेक चिटणीस, अंकुश मोरे, सोमनाथ साबळे, दीपक सुपेकर, भगवान ननावरे, सुभाष वैद्य, प्रसाद खाड्ये, हेमंत शिंदे, विलास कदम, बबलू जोरावरसिंग, कुक्कू सुद यांसारखे शिवसैनिक या शाखेच्या स्थापनेत सहभागी झाले.