
आरटीई प्रवेशासाठी धावपळ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ वाढली आहे. लॉटरीद्वारे काढलेल्या पहिल्या सोडत यादीत समावेश झाल्यानंतर शाळांमध्ये प्रवेश निश्चित करताना अनेक अडचणी येत आहेत. पोर्टलमधील तांत्रिक बिघाड, किचकट अटी-शर्तींमुळे आपल्या पाल्याचे पहिल्यांदाच प्रवेश घेणारे पालक गोंधळात पडले आहेत. आरटीईचे प्रवेश ८ मेपर्यंत घेता येणार आहे; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत ४२ टक्केच विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झालेले आहेत.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी रायगड जिल्ह्यातील २६४ शाळांनी २५ टक्के राखीव जागांवर दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. यासाठी ८ हजार ९६० पालकांनी अर्ज केले आहेत. ५ एप्रिलला झालेल्या सोडतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ३७९० विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीत झाली; मात्र पालकांना शाळेत जाऊन प्रवेशाची निश्चिती करता आलेली नाही. प्रवेशासाठी उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर लॉगिन करणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याने हे पोर्टल हॅंग होण्याचे प्रकार वाढले. अनेक पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, प्रवेश घेण्यात अडचणी उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांचे प्रवेश करण्यासाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर प्रतीक्षा यादीत ३१४२ अर्ज असून, त्यांच्या प्रवेशाबाबतही संभ्रमावस्था वाढली आहे.
प्रतीक्षा यादीवरील पालक संभ्रामवस्थेत
निवड यादीतील मुलांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर, प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळते. त्या वेळी पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात येतो. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेचा वेग पाहता प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील मुलांच्या प्रवेशाबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत.
***
आरटीई प्रवेशाच्या अटी-शर्ती
* मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
* आरटीई पोर्टलवरील हमीपत्र
* अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र
* अलॉटमेंट लेटरची प्रिंट
* निवासी पत्त्यावरील गुगल लोकेशन
***
पोर्टलवर प्रवेशासंदर्भात दिलेली माहिती संभ्रमात टाकणारी आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत संस्थांचीही मानसिकता सकारात्मक नसल्याने शाळांकडूनही योग्य ते सहकार्य मिळत नाही. यामुळे माहिती कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या प्रवेशाची ही पहिलीच वेळ असल्याने उत्साह अमाप आहे; मात्र प्रवेशाची निश्चिती केव्हा होणार याचीही काळजी लागून राहिली आहे.
- शंतनू पाटील, पालक-अलिबाग