रंग उतरण्याआधीच पुन्हा रंगरंगोटी

रंग उतरण्याआधीच पुन्हा रंगरंगोटी

वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी रंगरंगोटीची कामे सुरू करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी काही महिन्यांपूर्वीच रंगरंगोटी करण्यात आली होती; परंतु सुस्थितीत रंगवलेल्या भिंती असताना पुन्हा या ठिकाणी पालिकेने रंगरंगोटी करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी कररुपाने दिलेल्या पैशांची नासाडी होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी दरवर्षी भिंती रंगवण्यासाठी पालिकेने लाखोंचा खर्च करण्यापेक्षा दीर्घकालीन टिकाऊ, अशी रंगरंगोटी करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई शहराने स्वच्छ भारत सर्वेक्षणात अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. शहरातील उड्डाण पूल, भिंतींची रंगरंगोटी, मोठ्या नाल्यावर व रस्त्यालगत जाळ्या बसवणे, पदपथ व जीर्ण झाडांवर चित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेशदेखील दिला आहे. दरवर्षी मार्च महिन्यात होणारे स्वच्छ सर्वेक्षण यंदा लांबणीवर गेले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा अनेक प्रभागात नव्याने भिंती, उड्डाण पुलांची रंगरंगोटी करण्याचा सपाटा पालिकेने सुरू केला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी-जंक्शन येथील पुलाची काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती; मात्र आता पुन्हा याच पुलाच्या रंगरंगोटीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. दिघा ते बेलापूर मार्गावर रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या जाळ्या काही ठिकाणी पुन्हा नव्याने बसवण्यात येत आहेत.


उधळपट्टीला जबाबदार कोण?
पालिकेने एप्रिल आणि मे महिन्यात रंगरंगोटीची कामे सुरू केली आहेत; मात्र जून महिन्यात सुरू होणारा पावसाळा पाहता ही रंगरंगोटी कितपत राहील, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. जर स्वच्छ सर्वेक्षण पुन्हा लांबणीवर गेले तर पावसाळ्यानंतर पुन्हा नव्याने रंगरंगोटी केल्यास जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीला जबाबदार कोण, असा प्रश्नदेखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

---------------------
स्वच्छ सर्वेक्षण यंदा मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. शहरात ज्या ठिकाणी चित्र, शिल्प, भिंतींची दुरवस्था झाली आहे, त्यांच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com