निर्देशांकांची आगेकूच पुन्हा सुरू

निर्देशांकांची आगेकूच पुन्हा सुरू

मुंबई, ता. ४ ः अमेरिकी फेडरल बँकेने केलेली अपेक्षित पाव टक्के व्याजदरवाढ आणि परदेशी भांडवलाचा भारतात सुरू असलेला अव्याहत ओघ यामुळे आज (ता. ४) भारतीय शेअर बाजार निर्देशांकाने पुन्हा आपली तेजीची चाल सुरू केली. आज सेन्सेक्स ५५५.९५ अंश, तर निफ्टी १६५.९५ अंश वाढला. मागील आठवड्यातील पाच-सहा दिवसांच्या तेजीत बुधवारी खंड पडला होता. मात्र तो अल्पजीवी ठरला. सकाळी अल्पकाळ बाजार तळाला राहिल्यावर नंतर दिवसभर त्याच्यात वाढ होत गेली. शेवटच्या तासात निर्देशांकांनी जोरदार उसळी मारली. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,७४९.२५ अंशांवर, तर निफ्टी १८,२५५.८० अंशावर स्थिरावला.

आज बँका, अर्थसंस्था यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली; तर एफएमसीजी क्षेत्राचे शेअर मंदीत होते. आज एचडीएफसीसह अनेक कंपन्यांचे चांगले निकाल आल्यामुळे बाजारात उत्साह होता. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरवाढ केली असली तरी ती फार मोठी नव्हती आणि भविष्यातील संकेत देताना त्यांनी फार आक्रमकता न दाखवल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे आज निफ्टी अठरा हजारांच्या खाली आणि सेन्सेक्सही ६१ हजारांच्या खाली गेला नाही.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २२ शेअर, तर निफ्टीच्या ५० पैकी मुख्य ३३ शेअर नफ्यात होते. सेन्सेक्समधील बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फिन्सर्व्ह, एशियन पेंट्स, स्टेट बँक या शेअरचे भाव दोन ते साडेतीन टक्के वाढले; तर टीसीएस, एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, सन फार्मा, कोटक बँक यांचे भाव एक टक्का वाढले. दुसरीकडे इंडसइंड बँक, टाटा मोटर, आयटीसी यांचे भाव एक टक्का कमी झाले.
---
अमेरिकी फेडची मर्यादित दरवाढ आणि परदेशी गुंतवणुकीचा भारतात सुरू झालेला ओघ यामुळे तेजी पुन्हा सुरू झाली. फेडरल बँकेने भविष्याचे संकेत देताना भाषा जास्त आक्रमक ठेवली नसली तरी चलनवाढीची चिंता व्यक्त केल्यामुळे अमेरिकी बाजार मात्र तोट्यातच आहेत.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स
---
रुपया दोन पैसे वाढला
परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारतात सुरू असल्याने आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दोन पैसे वाढून ८१.७८ वर बंद झाला. आज व्यवहार सुरू झाल्यावर रुपया ८१.६८ ला उघडला होता. मात्र, नंतर तो त्या पातळीला टिकू शकला नाही. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान त्याने ८१.६५ चा उच्चांक व ८१.८४ चा निचांक गाठला होता. काल रुपया ८१.८० वर बंद झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com