
गायींची तस्करी करणारा जेरबंद
सकाळ वृतसेवा
डोंबिवली, ता. ५ : गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. शुक्रवारी (ता. ५) कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारत सोयब निजाम करके (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे; तर उर्वरित ५ आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी दोन गायींची सुटका करत एक रिक्षा, दोन स्विफ्ट गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर खाडी परिसरात जीन्स कारखान्याजवळ गायींना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. कारखान्याजवळील मोकळ्या जागेत हा कत्तलखाना सुरू असल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण घोलप, पोलिस हवालदार साळवी, बागुल, बाविस्कर, पावसे व पोलिस नाईक फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडी किनारी छापा मारत सोयब करके याला रंगेहात पकडत दोन गायींची सुटका केली. या दरम्यान पोलिस आल्याचे समजताच घटनास्थळावरुन इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, अरबाज, गोरू, मच्छिआवली, बारक्या असे इतर पाच आरोपी फरार झाले. घटनास्थळावरुन वाहनांसह लोखंडी सुरा, हूक, सुतळ यांसारख्या वस्तू हस्तगत केल्या आहेत.