माजी नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाडा

माजी नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाडा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ठाणे महापालिकेवर गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यातच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावीत, रस्त्यांची कामे, पावसाळ्यात पाणी साचते, त्या भागासाठी यंत्रणा राबविण्यात यावी, वृक्षांची छाटणी, वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास उपसा कसा करता येईल, आदी समस्यांचा पाढा सत्ताधारी माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांपुढे वाचला. यावेळी आयुक्तांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
शहरात सुरू होत असलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी माजी महापौर नरेश म्हस्के आणि त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शहरात सुरू असलेली विकासकामे असतील किंवा शहरातील रस्त्यांची, रंगरंगोटीची कामे असतील किंवा इतर कामेही सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. याच प्रशासकीय कामांचा काहींनी थेट विरोध केल्याचेही दिसून आले आहे. महापालिका हद्दीत अनेक समस्या आहेत, पावसाळ्यापूर्वी जी कामे महत्त्वाची मानली जातात, ती सोडविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. नालेसफाईनंतरही त्यात कचरा टाकला जातो, यासाठी माजी नगरसेवकांच्या माध्यमातून त्याठिकाणी सूचना फलक लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्या भागात नाले आहेत, त्या भागातील माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात एक दिवस निश्चित करून त्याठिकाणी कचरा, घरातील टाकावू वस्तू टाकण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यादिवशी त्याठिकाणी हा कचरा जमा झाल्यानंतर पालिकेच्या गाड्या येऊन हा कचरा घेऊन जातील, जेणेकरून नाल्यात ही घाण जाणार नाही. त्यातून नालेदेखील स्वच्छ राहणार आहेत.
ठाणे पालिका आयुक्तांसोबत पार पडलेल्या बैठकीत काही कामांच्या मुद्यावरून माजी नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अधिकारी आमचे ऐकत नाहीत, ठेकेदार सांगितलेले काम योग्य पद्धतीने करीत नसल्याच्या तक्रारींचा पाढाही यावेळी काही माजी नगरसेवकांकडून वाचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com