
कल्याण-डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीकपात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : मान्सून लांबण्याचे संकेत मिळत असल्याने धरणातील पाणीसाठा जपून वापरावा, अशा सूचना लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यांपर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी केडीएमसी हद्दीत दर मंगळवारी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रकियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा पुरेल, अशा पद्धतीने लघु पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा वितरणाचे नियोजन करण्यात येते. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जुलैपर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा असल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागला नव्हता. मात्र यावर्षी मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तास (सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत) पर्यंत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामीण (शहाड, वडवली, आंबिवली व टिटवाळा), डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.