खोणी गावाजवळील नदी पात्रातील मासे मृत

खोणी गावाजवळील नदी पात्रातील मासे मृत

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : ठाणे जिल्ह्यातील नद्या या प्रदूषित होत असून जलपर्णींचादेखील त्यांना विळखा पडत आहे. यामुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. मलंगगड नदीचे पात्रदेखील याला अपवाद नसून या पात्रातील खोणी गावाजवळ शेकडो मासे मृत पावल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. काही ग्रामस्थांनी नदीच्या पाण्यावर मृत माशांचा खच पाहिला असता हे लक्षात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाण्यावर पसलेल्या जलपर्णीमुळे जलचरांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी मलंगगड नदी ही अनेक गावांतून वाहात येऊन पुढे देसाई खाडीला मिळते. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात जलपर्णी विस्तारत आहे. वाढत्या जलपर्णीमुळे बारमाही वाहणाऱ्या या नदीतील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेसा फायदा होत नाही. जलपर्णीमुळे नदीतील जलचरांनादेखील धोका निर्माण झाला आहे. खोणी गावाजवळील नदीपात्रातील मासे मृत पावले असून शेकडो माशांचा खच हा पात्रावर तरंगत आहे. तसेच त्याला दुर्गंधी सुटण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्र जलपर्णीने वेढलेले असल्याने त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष जात नाही; परंतु जलचर मेल्यामुळे आता याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
......
उपाययोजना करण्याची मागणी
खोणी गावाजवळील नदीपात्रात मृत माशांचा खच पडला असून त्याला दुर्गंधी सुटण्यास सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती आणखी पुढे वाढण्याआधीच प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. माशांचा खच हटविणे त्याबरोबरच जलपर्णीदेखील काढण्यात यावी; अन्यथा पावसाळ्यात गंभीर परिस्थिती गावागावांत उद्‌भवण्याची शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत.
......
खोणी गावाजवळील नदीपात्रात मृत मासे आढळून आले आहेत. या माशांचा मृत्यू जलपर्णीमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होऊन अशी घटना घडू शकते. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतर यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
- उपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ
....
नदीपात्रातील वाढत्या जलपर्णीविषयी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत बैठकांमध्ये विषय घेतले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे; परंतु ते दिले जात नाही.
- महेश ठोंबरे, ग्रामस्थ, खोणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com