पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेत भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेत भर
पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेत भर

पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेत भर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने रात्रीच्या वेळी महिला डब्यात सुरक्षा रक्षक नसल्याने महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात आणखी २०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर २०० एमएसएफ जवान तैनात होणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेत आणखी भर पडणार आहे.
लोकलच्या महिला डब्यातील सुरक्षा, फलाट व पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रणासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर एमएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. लोकल प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग, मारहाणीचे प्रकार होतात. महिला प्रवाशांवर गर्दुल्ल्यांकडूनही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत लोकलच्या प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. ३ मे रोजी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर १.१० च्या सुमारास शेवटच्या चर्चगेट-बोरिवली रेल्वेतून काही महिला प्रवास करत असताना महिला डब्यात जीआरपी अथवा आरपीएफ जवान तैनात नसल्याचे दिसून आले. या वेळी एका महिला प्रवाशाने रेल्वे पोलिसांना याबाबत विचारणा केली असता महिला प्रवासी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून रात्रीच्या वेळी महिला डब्यातील सुरक्षा रक्षक नसल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे बोर्डाकडे मागणी
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे; तर गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी ही लोहमार्ग पोलिसांकडे आहे. सध्या या सर्व पोलिसांच्या सोबतीला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारीही तैनात असतात. महिला प्रवाशांसंबंधित होणारे गुन्हे, तक्रारी पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची असलेली सुरक्षा तोकडीच पडत आहे. त्यातच महिला डब्यात सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने २०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाने दिली आहे.