
अपुरी वेतनवाढ रद्द करण्याची सुरक्षा रक्षकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यातील सुरक्षा रक्षकांची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली वेतनवाढ अखेर राज्य सरकराने केली आहे, परंतु सुरक्षा रक्षकांना ती मान्य नसून वेतनवाढीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला जात आहे. शासनाने जाहीर केलेली वेतनवाढ पुरेशी नसून ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी ‘माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहनचालक संघटने’ने केली आहे. प्रसंगी सुरक्षा रक्षकांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
वेतनवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. सर्व संघटनांशी विचारविनिमय करून सुधारित वेतनवाढ जाहीर करावी. महागाईनुसार वेतनवाढ देता येत नसेल तर ती करू नये. तुटपुंज्या वेतनावर सुरक्षा रक्षक काम करतील. आपणास गोरगरीब सुरक्षा रक्षकांशी काही देणे-घेणे नसल्याचे आपण केलेल्या वेतनवाढीच्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे, असे ‘माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक संघटने’चे कार्याध्यक्ष अभिलाष डावरे यांनी म्हटले आहे. वेतनवाढ तात्काळ रद्द केली नाही तर शासनाला सुरक्षा रक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी कामगार मंत्र्यांची आणि ज्या संघटनांनी वेतनवाढीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे त्यांची असेल. मंजूर केलेली वेतनवाढ रद्दबातल ठरवली नाही, तर आपल्याविरोधात समस्त महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक आंदोलन करतील. त्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे अभिलाष डावरे यांनी सांगितले.
शासनाने पुनर्विचार करावा
कोरोनापासून आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. वाढत्या महागाईमुळे मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरायचे, घरभाडे कसे द्यायचे, कुटंब कसे चालवायचे व आरोग्य खर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. राज्य सरकराने अनेक वर्षांनंतर १३७५ रुपयांची वेतनवाढ केली आहे. राज्य सरकराने वाढती महागाई लक्षात घेऊन साधारण चार ते पाच हजार रुपये वेतनवाढ करायला हवी. शासनाने सुधारित वेतनवाढ जाहीर करावी, अशी मागणी मुंबईतील काही सुरक्षा रक्षकांनी केली.