गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे ‘आयडियल’ तरुण

गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे ‘आयडियल’ तरुण

सकाळ वृत्तसेवा, मुंबई
शिक्षण व्यवस्थेत होत असलेल्या बदलांमुळे आणि विद्यार्थ्यांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता खासगी शिकवण्यांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे. या प्रतिसादामुळेच अनेक खासगी शिकवण्यांमध्ये अधिक शुल्क आकारले जाते. अशा वेळी गोवंडीतील तरुणांनी गरीब आणि खासगी शिकवण्यांचे भरमसाट शुल्क भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयडियल एज्युकेशन’ नावाची शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे. गोवंडीतून या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचेही गोवंडी केंद्राचे अध्यक्ष झिशान शेख यांनी सांगितले.

‘आयडियल एज्युकेशन मुव्हमेंट’ १९ वर्षांपासून मुंबईत कार्यरत आहे. या अंतर्गत उर्दू भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोफत खासगी शिकवणी दिली जाते. या शिकवणीत प्रवेशासाठी केवळ ५०० रुपये अनामत रक्कम तीही परतफेडीच्या अटीवर घेत प्रवेश दिला जातो. यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतच्या उर्दू भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. उन्हाळी सुट्यांदरम्यान मे महिन्यात प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येते. आयडियलची मुंबईत १० पेक्षा अधिक केंद्रे आहेत. यामध्ये उच्चशिक्षित आणि तज्ज्ञ शिक्षकवृंद कार्यरत असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना या संस्थेने घडविले आहे. गोवंडीत गेल्या वर्षीच या संस्थेची शाखा सुरू करण्यात आली असून येथे २०० विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.
शिक्षणात हुशार असून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काम करतो. आम्ही दर आठवड्याला पालकांसोबत मीटिंग घेतो. त्यांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा देतो. मुलंही परिस्थिती गरिबीची असल्याने जिद्दीने अभ्यास करतात. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन देणारे सेमिनार घेतले जातात; तर पदवीचे शिक्षण घेताना उर्दू भाषेतून अचानक हिंदी किंवा इंग्रजी भाषेकडे जाताना मुलांना येणारे अडथळे लक्षात घेता संस्थेने यंदाच्या वर्षीपासून करिअर मार्गदर्शन आणि भाषाज्ञान या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले आहे, अशी माहितीही झिशान शेख यांनी दिली.

एक वर्षापासून आयडियल स्कूलमध्ये मार्गदर्शन घेतो आहे. येथे मिळणाऱ्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे मला शाळेत चांगले मार्क्स मिळाले. येथील शिक्षक उच्चशिक्षित असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे निश्चितच आम्हाला फायदा होत आहे.
- शाझेबुद्दीन, विद्यार्थी

गोवंडीत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. येथे राहणारे नागरिक हे मजुरी किंवा छोटी छोटी कामे करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे; मात्र त्यांची मुले शाळेत शिक्षण घेतात. अनेक मुलं अभ्यासात हुशार आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हे लक्षात घेता आम्ही आयडियलशी संपर्क साधला. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत गेल्या वर्षी या भागात त्यांचे सेंटर सुरू केले. आज शेकडो मुले येथे शिक्षण घेत आहेत.
- शेख फय्याज, सामाजिक कार्यकर्ते

सर्वांना समान ज्ञान आणि समान शिक्षण मिळवून देणे हा मोफत शिक्षणाचा उद्देश आहे. मला माझ्या समुदायातील सदस्यांना एकच सांगावेसे वाटते, की ज्यांना आपल्या मुलांना शिक्षण देणं परवडतं त्यांनी याचा लाभ घेऊ नये. आज आपल्या समुदायातील असंख्य मुलांना या उपक्रमाची आवश्यकता आहे; मात्र मर्यादित जागांमुळे अनेकांना इथे येऊन शिकण्याची संधी मिळू शकली नाही. आपल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हाच याचा उद्देश आहे.
- खान मोहम्मद अरीझ, शिक्षक, आयडियल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com