
अवकाळी पावसाचा फुलांनाही फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः अवकाळी पावसाने यंदा पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. याचा फटका यंदा फुलांनाही बसला आहे. त्याचा परिणाम मुंबईतील फूल बाजाराला बसल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईत फुलांची आवक कमी झाली असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली आहे.
फूलबाजारात फुलांच्या भावात नेहमी चढ-उतार असतो. त्यामुळे फुलांच्या दरावर अवकाळी पावसाचा किती परिणाम झाला हे सांगता येणार नाही; मात्र अवकाळीचा काही प्रमाणात फुलांच्या पिकांना फटका बसला आहे हे नक्की. बाजारात फुले आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे किती नुकसान झाले याचा मुंबईत राहून आपणास अंदाज येत नाही; मात्र या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाल्याची माहिती फूलबाजार व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी दिली.
वाहतूक रखडल्याचा परिणाम
अवकाळी पावसाने रस्ते खचले, त्यामुळे फुलांची वाहतूक करणारे ट्रक अडकून पडले आहेत. मुंबईत पोहोचण्यात त्यांना विलंब झाला. काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. काही ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी याचाही परिणाम फूल बाजारावर झाला आहे, अशी माहिती झाल्याचे पांडुरंग आमले यांनी दिली.
दादर फूल मार्केटमध्ये दररोज पुरेसा माल येत असून फुलांचा दर कमी-जास्त होत असतो. सध्या बाजारात सर्व प्रकारची फुले येत आहेत. सणासुदीच्या दिवसांत फुलांना मोठी मागणी असते. सध्या शाळकरी मुलांच्या सुट्ट्या लागल्याने लोक गावी जात असल्यामुळे या दिवसांत फुलांची मागणी कमी आहे.
- महेंद्र गडगे, फूल व्यापारी
फुलांचे दर
मोगरा- २४० रुपये किलो
सायली- २३० रुपये किलो
जुई- १८० रुपये
गोंडा- ४० रुपये किलो
बिजली- ३० रुपये किलो
२० गुलाब जुडगा- ८० रुपये