रेल्वे स्थानकालगत फेरिवाल्यांचे अतिक्रमण

रेल्वे स्थानकालगत फेरिवाल्यांचे अतिक्रमण

रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
कारवाईचा दुष्काळ; नागरिक त्रस्‍त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांलगत अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असल्‍याचे चित्र आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे; मात्र या फेरीवाल्यांविरुद्घ कारवाईबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे; मात्र नियम धाब्यावर बसवून अनधिकृत फेरीवाले आपली दुकाने थाटून बसत आहेत. मुंबईतील दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, सीएसटी आदी रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी वेढला गेला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना कसरत करून चालावे लागत आहे. ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत; मात्र यावर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्‍याने फेरीवाल्‍यांचेही फावत आहे. त्‍यामुळे दररोज प्रवास करणारे याबाबत संताप व्यक्‍त करत आहेत.

कारवाई थंडावली
फेरीवाल्यांविरुद्ध पालिकेने सुरू केलेली कारवाई थंडावल्यानेच रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असल्‍याचे प्रवाशांचे म्‍हणणे आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जवळपास सर्वच रेल्वे स्थानके गजबजलेली असतात. प्रवाशांना फेरीवाल्यांचा मोठा अडथळा ठरतो. लोकल पकडण्यासाठी धावताना या फेरीवाल्‍यांच्या गराड्यातून बाहेर पडणे अवघड जात असल्‍याचे प्रवाशांचे म्‍हणणे आहे.

दादर पुन्हा जैसे थे
दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र करण्यात आली होती. या कालावधीत येथील रस्ते काहीसे मोकळे झाल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते; मात्र आता ही कारवाई मोहीम थंडावल्याने येथे पुन्हा फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत.

पालिका मुख्यालयासमोरच बस्‍तान
सीएसएमटी रेल्वे स्थानकातील भुयारात सुरक्षारक्षक ठेवूनही येथे अनधिकृत फेरीवाले वाट अडवून बसत असल्‍याचे दिसून येत आहे. शनिवारी, रविवारी तर भुयाराचा मॉल होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. भुयाराच्या बाहेरच्या मोकळ्या जागाही फेरीवाल्यांनी गजबजून जातात. येथे पालिकेचे मुख्यालय बाजूलाच आहे; मात्र पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

मोकळ्या जागांवर अतिक्रमणे
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे; मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून फेरीवाले रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पुलावर सर्रास व्यवसाय करीत आहेत. मोकळ्या जागा अडवल्या जात असल्याने नागरिकांना कसरत करून चालावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com