खारघर उष्माघात प्रकरण न्यायालयात

खारघर उष्माघात प्रकरण न्यायालयात

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे झालेल्या १४ श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल न केल्याने आम आदमी पार्टी-महाराष्ट्राच्या वतीने पनवेल न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच या दुर्घटनेचा सखोल चौकशी अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आपतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी येत्या २६ मे रोजी होणार आहे.
खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी १४ श्री सदस्यांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आणि आजारी पडण्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर १८ एप्रिलला आप महाराष्ट्रच्या वतीने या सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार खारघर पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र या संदर्भात खारघर पोलिसांकडून कोणतीच कृती न झाल्याने आपच्या कार्यकर्त्यांनी २४ एप्रिलला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. तसेच त्यांनाही लेखी निवेदन देऊन आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने आपने पनवेल न्यायालयात धाव घेतली. आम आदमी पक्ष महाराष्ट्रचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी या प्रकरणात मुख्य सचिव, सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग, खारघर पोलिस; तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे.
सरकारतर्फे दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली आहेत. मृतांचे शवविच्छेदन करण्यात हलगर्जीपणा करण्यात आला, यांसह अनेक मुद्दे आपतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच न्यायालयाने पोलिसांना दुर्घटनेचा सखोल चौकशी अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. आपतर्फे ॲड. जयसिंग शेरे, ॲड. सुवर्णा जोशी, ॲड. सादिक शिलेदार, ज्येष्ठ वकील ॲड. असीम सरोदे काम बघत आहेत.


पनवेल न्यायालयात याबाबतची केस दाखल झाली आहे. ३ मे रोजी प्रथम सुनावणी झाली. या घटनेबाबत ठोस कृती न करता राज्य सरकार एक सदस्यीय कमिटी नेमून वेळकाढू उपाय अवलंबित आहे. यावरून सरकार ही घटना विशेष गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
- धनंजय शिंदे, राज्य सचिव, आप-महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com