पेणमध्ये प्लास्टिक बंदी कागदावरच

पेणमध्ये प्लास्टिक बंदी कागदावरच

पेण, ता. ९ (वार्ताहर) : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत प्लास्टिक पिशव्यांना बंदी असूनही पेणमध्ये त्‍याचा सर्रास वापर होताना दिसतो. त्‍यामुळे प्लास्टिक बंदी फक्त कागदावरच राहिल्‍याचे चित्र दिसत आहे. शहराच्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, आड बाजूला कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा कचरा पडलेला दिसतो. शहरातून जमा होणाऱ्या सुक्या कचऱ्यामध्येही प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांची संख्या आहे. गटारे, नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाण कचऱ्याबरोबरच प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसतो.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून कचरा डेपो कुंड्‌या उचलून परिसर स्वच्छ करीत त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ठेवले आहेत. तर काही ठिकाणी झाडे लावून परिसर स्‍वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण शहरातील वाढती लोकसंख्या पाहता शहरातून दररोज १५ टनांपेक्षा जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळते.
बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. शहरात असंख्य हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भाजीवाले, व्यापारी व इतर व्यावसायिक, हातगाडीवाले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्‍यामुळे बाजार पेठ, भाजी मंडईची मागील बाजू, उत्कर्ष नगर, दातार आळी-बोरगांव रोड, झिराळ आळी, कुंभार तलाव परिसर, भोगावती नदी परिसर, नगरपालिका स्टेडिअमच्या मागील बाजू आदी ठिकाणी प्लास्टिक कचरा दिवसेंदिवस साचत आहे. पेण नगरपालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याची मोहीम या पूर्वीही चालू होती आणि आताही चालूच आहे मात्र काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होताना दिसत असल्‍याने बंदी केवळ कागदावरच राहिल्‍याचे दिसून येत आहे.

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत प्लास्टिक पिशवी वापरणे बंदी असूनही काही हातगाडी, भाजीवाले, व्यापारी, या आदेशाकडे कानाडोळा करीत याची पायमल्ली करीत आहेत. मात्र अशा पद्धतीने कोणी प्लास्टिक बंदी वापरत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सदर प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येईल तसेच संबंधितावर गुन्हाही दाखल करण्यात येईल.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com