कचरा संकलनाचा वेग वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा संकलनाचा वेग वाढणार
कचरा संकलनाचा वेग वाढणार

कचरा संकलनाचा वेग वाढणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : स्वच्छ आणि सुंदर ठाणे ही संकल्पना राबवताना शून्य कचऱ्‍याच्या दिशेने ठाणे महापालिकेने वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी शहरात निर्माण होणारा कचरा उचलणाऱ्‍या घंटागाड्यांची संख्येसह कॉम्पॅक्टरचा ताफा वाढवण्यात येणार आहे. छोट्या आणि मोठ्या आकाराचे सुमारे ८० ते ९० कॉम्पॅक्टरसह घंटागाड्या घेण्याचा पालिकेचा मानस असून त्यामुळे कचरा संकलनाचा वेग वाढण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर फिरणाऱ्‍या घंटागाड्यांच्या फेऱ्‍या कमी होऊन एकाच वेळी शहरातील सर्व कचरा घनकचरा प्रकल्पाकडे रवाना होण्यास मदत होणार आहे. येत्या सहा महिन्यात ही नवीन यंत्रणा संपूर्ण शहरात सुरू होणार आहे.
ठाणे शहरात दररोज सुमारे ८०० टन कचरा जमा होतो. घरोघरी जाऊन तसेच कचराकुंड्यांमधील हा कचरा संकलित करण्यासाठी आजच्या घडीला सुमारे ३०० घंटागाड्या आणि कॉम्पेक्टर शहरात तीन शिफ्टमध्ये फिरत आहेत. यामध्ये चार चाकी, सहाचाकी घंटागाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात आहे; मात्र त्यांची संख्या आता अपुरी भासू लागली आहे. शिवाय या घंटागाड्या केवळ रस्त्यांवर किंवा सोसायट्यांच्या प्रवेशद्वारापर्यंतच जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे घंटागाड्या तीन शिफ्टमध्ये कचरा संकलित करत असले, तरी दिवसभर त्यांच्या फेऱ्‍या सतत सुरू असतात. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी पालिकेने आता ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्त केली होती. या संस्थेने शहरातील सुमारे १५० कचरा पॉईंटचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. लवकरच हा अहवाल पालिकेला सादर होणार आहे; पण त्यामध्ये प्रामुख्याने घंटागाड्या आणि कॉम्पॅक्टरची संख्या वाढवण्यावर प्राथमिक भर देण्यात आला आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात कचरा संकलित करण्यासाठी तीनचाकी छोटे कॉम्पॅक्टरची गरज आहे; तर ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पाहचू शकत नाही, अशा ठिकाणी कचरावेचकांची संख्या वाढवण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घंटागाड्या आणि कॉम्पॅक्टरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू करून या महिन्यात ताफा वाढवणार असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात आधीच ८० कोटींची तरतूद केली आहे; तर वेचकांच्या मानधनासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कचरासंकलनाच्या ठेक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराच्या माध्यमातून नवीन पद्धतीने कचरा संकलित करण्याचा ठेका देण्यात येणार आहे. हे कंत्राट सात वर्षांसाठी असेल. कचरा संकलन करण्यापासून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत त्याची वाहतूक शास्त्रोक्त पद्धतीने होईल, असे नियोजन आहे. त्यामुळे सर्व गाड्या नवीन असतील, यासाठी प्रयत्न असणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

कोणतीही कामगारकपात नाही
या मोहिमेमुळे जुन्या कालबाह्य घंटागाड्यांची संख्या कमी होईल, अशी शंका ठेकेदार उपस्थित करत आहेत. त्यामुळे घंटागाड्यांवर काम करणाऱ्‍या ६०० कर्मचाऱ्‍यांची संख्या निम्मी होऊन ३०० जण बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नवीन सक्षम घंटागाड्या येणार आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या घंटागाड्यांची संख्या कमी होताना दिसली तरी क्षमता वाढणार आहे. तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये कुठेही कामगारांची कपात होणार नाही, असा दावाही बांगर यांनी केला.

ठेकेदारांची हेरा‘फेरी’ थांबणार
शहरातील कचरा संकलनासाठी आतापर्यंत साधारण ५० कोटींपर्यंत खर्च पालिकेला येत होता. नवीन कॉम्पॅक्टरमुळे वेळेची बचत होणार असली, तरी खर्च वाढणार आहे. पण असे असले, तरी पालिकेच्या तिजोरीत बचतच होणार असल्यचा दावा घनकचरा विभागाने केला आहे. आतापर्यंत घंटागाडी कंत्राटदाराला फेऱ्‍यांनुसार पैसे दिले जात होते. मग एका फेरीमध्ये तो दोन टन कचरा उचलेल किंवा आठ टन. त्यामुळे जितक्या फेऱ्‍या तितका ठेकेदाराला फायदा होता. आता कॉम्पॅक्टरमुळे या फेऱ्‍यांना लगाम बसणार आहे. कारण चार वेळा जी घंटागाडी कचरा संकलनासाठी एकाच ठिकाणी फेरी मारायची त्याऐवजी एकच कॉम्पॅक्टर एकाच वेळी संपूर्ण कचरा संकलित करणार आहे. शिवाय फेऱ्‍यांनुसार नव्हे, तर नवीन प्रक्रियेमध्ये टनानुसार पैसे अदा केले जाणार असल्याने जास्तीत जास्त कचरा उचलण्याचा ठेकेदाराचा कल राहील, असा विश्वास घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी सांगितले.