वैद्यकीय शिक्षण धोरणात बदल आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय शिक्षण धोरणात बदल आवश्यक
वैद्यकीय शिक्षण धोरणात बदल आवश्यक

वैद्यकीय शिक्षण धोरणात बदल आवश्यक

sakal_logo
By

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर तयार होत नाहीत, यासाठी सरकारचे वैद्यकीय शिक्षण धोरण एक महत्त्वाचे कारण आहे. सरकारकडून त्यात बदल होण्याची आवश्यकता आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. संघटनेच्या वतीने मिरा रोड येथे मेडिकॉन २०२३ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यभरातून तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आदी पद्धतीत होत असलेले बदल, नवीन औषधे, नवीन प्रतिजैविकांचा वापर आदी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिरा भाईंदर शाखेतर्फे मेडिकॉन २०२३ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले की, तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण भागाकडे वळत नसल्याची ओरड नेहमीच होत असते; मात्र त्यासाठी ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, हे महत्त्वाचे कारण आहे. मात्र सरकारचे वैद्यकीय शिक्षण धोरणही त्याला कारणीभूत आहे. या धोरणात महत्त्वपूर्ण बदल होणे गरजेचे आहे. या परिस्थितीत हळूहळू बदल होत आहेत. आता प्रत्येक जिल्हास्तरावर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. अशोक आढाव, डॉ. जयेश लेले, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. राजीव अग्रवाल, डॉ. राखी अग्रवाल आदी उपस्थित होते.

संघटनेकडून ग्रामीण भागात सेवा
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ‘गावाकडे चला’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संघटनेच्या दोन हजार शाखांकडून गावे दत्तक घेतली जात आहेत. असोसिएशनचे तज्ज्ञ डॉक्टर गावातील वैद्यकीय सेवा न परवडणाऱ्यांच्या दारी जाऊन त्यांना आरोग्य सेवा देत आहेत, अशी माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी दिली.

रुग्णांची पिळवणूक थांबवण्याचा प्रयत्न
खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांकडून रुग्णांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी डॉक्टर ग्रुप प्रॅक्टिस या संकल्पनेतून जिल्हास्तरावर सर्वसामान्यांना स्वस्त व दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णालये सुरू करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात रिक्षाचालक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यासाठी रिक्षाचालकांना हृदयाशी संबंधित सीपीआर प्रशिक्षण दिले जात असून असोसिएशन २४ हजार रिक्षाचालकांना प्रशिक्षण देणार आहे.
- डॉ. रवींद्र कुटे, महाराष्ट्र अध्यक्ष,
इंडियन मेडिकल असोसिएशन