जगदंबा उत्सवात विंचू, रावण लक्षवेधी

जगदंबा उत्सवात विंचू, रावण लक्षवेधी

मोखाडा, ता. ७ (बातमीदार) : आदिवासींची प्राचीन संस्कृती असलेला जगदंबा उत्सव (बोहाडा) मोखाड्यातील खोडाळा येथे तीन दिवस साजरा करण्यात आला. अखेरच्या दिवशी विंचू, वराह, नंदी आणि दशानन रावणाने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले होते. या उत्सवाला पालघरसह नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील जगदंबा भक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती; तर विविध जिल्ह्यांतील पैलवानांनी कुस्तीच्या फडात हजेरी लावली होती.

शेकडो वर्षांची परंपरा असलेला जगदंबा उत्सव खोडाळा गावात ४, ५ आणि ६ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात विविध देवदेवतांचे मुखवटे घालून संबळच्या तालावर सोंगे नाचवण्यात आली. अखेरच्या मुख्य उत्सवात सुमारे २९ देवदेवतांचे मुखवटे नाचवण्यात आले होते. या वेळी विंचू, वराह, नंदी आणि दशानन रावणाने हजारो भक्तांचे लक्ष वेधले. नागरिक त्यांना मोठ्याने ओरडून प्रोत्साहित करत होते. गावात वेगवेगळ्या ठिकाणांहून लहान मुलांसाठी खेळ आणि महिलांच्या आभूषणांची दुकाने थाटली होती. खाऊच्या दुकानांनी बाजारपेठ रात्रभर सजली होती.

कुस्त्यांचा जंगी फड
देवीची मिरवणूक संपल्यानंतर कुस्त्यांचा फड भरवण्यात आला होता. मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी ५०० रुपयांपासून तीन हजार रुपये आणि चांदीची गदा बक्षीस रूपाने ठेवण्यात आली होती. या कुस्त्यांना पालघर, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील मल्लांनी हजेरी लावली होती. कुस्ती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.

आदिवासींची प्राचीन संस्कृती आणि परंपरा असलेल्या जगदंबा उत्सवात सर्व जाती, धर्माच्या नागरिकांना एकत्र घेऊन सामाजिक ऐक्य जपण्याचा प्रयत्न केला. ही परंपरा कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे. सर्वांनीच सहकार्य केल्याने शांततेत आणि विनाविघ्न उत्सव पार पाडला, हीच ऐक्याची पावती मिळाली.
- उमेश येलमामे,
अध्यक्ष, जगदंबा उत्सव समिती, खोडाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com