
आरटीओ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी (ता. ८) दोन तास आंदोलन करण्याचा निर्णय मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आरटीओमधील कामकाज सकाळच्या सत्रात दोन तास ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतिबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आकृतिबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास २०१६ मध्ये सादर केला होता. आकृतिबंध मंजुरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. शासन निर्णय प्रसिद्ध होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही आकृतिबंध कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत.
विभागातील पदोन्नतीचे सत्र नाहक प्रलंबित ठेवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून सेवाविषयक उन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.
वर्ग-२ची पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळेही कर्मचारीवर्गात संताप आहे. शासन/प्रशासनाने मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी; अन्यथा तीव्र संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली आहे.