
वाढीव दराने कचरा पेट्यांची खरेदी?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मुंबई महापालिका बरखास्त झाल्याने नगरसेवक अस्तित्वात नाहीत. त्यामुळे पालिकेचा गाडा प्रशासक हाकत आहेत. तरीही सध्या कचरा पेट्यांची खरेदी मात्र नगरसेवकांच्या निधीतून केली जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी खरेदी केलेल्या दरापेक्षा त्यासाठी प्रतिनग ४६९ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. तब्बल एक लाख २० हजार कचरा पेट्यांची खरेदी केली जात असून जादा दराबाबत माजी नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती ८ मार्चपासून सोपवण्यात आला. त्यामुळे प्रत्येक कामकाज प्रशासक म्हणून आयुक्तांच्या मंजुरीनंतर होत आहे; परंतु एक लाख २० हजार कचरा पेट्यांची खरेदी नगरसेवक निधीतून केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक पद अस्तित्वात नसले, तरी त्यांचा अभाव प्रशासकीय यंत्रणेला जाणवत आहे.
वाढीव दराने खरेदी?
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कचरा पेट्या प्रत्येकी १११५ रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्या होत्या; परंतु आता उत्पादक कंपन्यांकडून त्या घेतल्या जात असून त्यासाठी १५८४ रुपये म्हणजे ४६९ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. आपल्या नावाखाली खरेदी होत असून प्रशासकाच्या कालावधीत अधिक दराने ती केली जात असल्याने माजी नगरसेवकही संशय व्यक्त करीत आहेत.