
घणसोलीत खुलआम जुगाऱ्यांचे अड्डे
घणसोली, ता.८ (बातमीदार)ः विभागात अनेक वर्षांपासून बंद असलेले सदगुरू हॉस्पिटलचा परिसर सध्या जुगाऱ्यांचा अड्डा झाला आहे. याठिकाणी दिवसाढवळ्या खुलेआम जुगार खेळला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
घणसोली विभागात अनेक ठिकाणी खुलेआम जुगाराचे अड्डे सुरु आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवरील दुभाजकांच्या जागांसोबतच उड्डाणपुलाखालील मोकळ्या भूखंडांवर जुगाऱ्यांचा वावर आहे. अशातच घणसोली विभागातील सदगुरू हॉस्पिटलच्या आवारात देखील जुगाराचे अड्डे सुरू असल्याने परिसरातील शालेय मुलांवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
---------------------------------
घणसोलीमधील शेतकरी शाळेच्या आवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-अजय भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे