विहिगावात तीव्र पाणी टंचाई

विहिगावात तीव्र पाणी टंचाई

खर्डी, ता. ९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या शेजारी असलेल्या आदिवासी वाड्यावस्त्यावरील महिला सद्यस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकत आहे. कसारा विभागातील विहिगाव तेलमपाडा येथे टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने महिलांना तीन किलोमीटरवर खाच खळग्यातील व डबक्यातील पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे या पाड्यावर रोज चार टँकरने पाणीपुरवठा करावा व येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विहिगाव ग्रामपंचयती अंतर्गत येणाऱ्या विहिगाव/तेलमपाडा येथे ७५ च्या आसपास घरे असून अंदाजे ५००च्या आसपास लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत येथील विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून पाण्याचा कुठलाही स्रोत नसल्याने जानेवारीत येथे तिव्र पाणी टंचाई जाणवत असते. येथील रहिवाशांना पाण्यासाठी जवळील जंगलातील डबक्यातून मातीमिश्रीत पाणी प्यावे लागत आहे. येथे शहापूर नगरपंचायतीकडून रोज एका टँकरने पाणीपुरवठा होत असतो. परंतु एक टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने येथील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने वणवण भटकावे लागत आहे.
गावाजवळच साधारण दोन किमी अंतरावर मध्य वैतरणा धरण तसेच अशोका धबधबा आहे. या धरणातून १०० किमी अंतरावरील मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. परंतु लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे घराच्या समोर पाणी दिसत असूनसुद्धा येथे कुठलीही पाणीपुरवठा योजना राबवण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक रहिवाशी संताप व्यक्त करीत आहेत.
.........
वाटरव्हिलची व्यवस्था करा
महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी त्यांना शासनाने वाटरव्हिलचे वाटप केल्यास त्यांच्या डोक्यावरील हंडा खाली येईल व वॉटरव्हिलच्या सहाय्याने पाणी रस्त्यावरून भरलेला वॉटरव्हिल ढकलत आणता येईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी ग्रासस्थांतून होत आहे.
-------
दिवसभरात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने महिलांना पाण्यासाठी मध्य वैतरणा धरणाजवळ असलेल्या जलस्रोतांतून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्या येथे २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा व पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी.
- वाळकू उघडे, स्थानिक रहिवाशी
----------------------------
रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पंचायत समितीकडे वाढीव टँकरची मागणीसाठी पत्रव्यवहार करण्यात येईल.
- एम. दळवी, ग्रामसेवक
....
खर्डी : टँकरआल्यावर पाणी मिळविण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.

टॅंकरने होणारा पाणीपुरवठा अपूरा पडत असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com