
वालधुनी नदी कचऱ्याने तुडुंब
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताच कचऱ्याने तुंबलेल्या वालधुनी नदीच्या पात्राचे आणि रस्तारुंदीकरणात तोडण्यात आलेल्या अर्धवट शौचालयाचे दर्शन होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र असल्याने ही समस्या सोडवण्यासाठी कुणी वाली आहे की नाही, असा सवाल वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा, शहीद मारोतीराव जाधव आणि रिक्षा चालक मालक युनियनचे माजी अध्यक्ष राम भोसले यांनी उपस्थित केला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला वालधुनी नदीचे पात्र आहे. एकेकाळी मासेमारी, पोहण्याचे, कपडे धुण्याचे ठिकाण असलेली ही नदी आता गटारगंगा झाली आहे. यात केमिकलचे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने रंग बदलणारी नदी अशी ओळख या नदीची झालेली आहे. पालिकेच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत असल्यावरही या नदीत प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकणारे नागरिक आवाहनाला फाटा देत आहेत. त्यामुळे स्थानकाच्या बाहेर उतरून पादचारी पुलावरून येताजाताना कचऱ्याने तुंबलेल्या नदी पात्राचे दर्शन पादचाऱ्यांना होताना दिसत आहे. यासंदर्भात वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा आणि त्यांची टीम यांच्या मागणीनुसार नदीचे पात्र साफ केले जाते. पण कालांतराने पुन्हा नदीच्या पात्राची जैसे थे होणारी अवस्था ही पाचवीला पूजणारी ठरत आहे.
स्थानकाच्या बाहेर पडताच कुठेतरी प्रसन्नतेचे वातावरण असावे असे पादचाऱ्यांना वाटते. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून बाहेर पडल्यावर पालिकेने अर्धवट तोडलेल्या सार्वजनिक शौचालयाचे दर्शन होताना दिसत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या बाहेर शौचालय नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत होती. तेव्हा स्वर्गीय सुनील सुर्वे हे नगरसेवक असताना त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने चारपाच वर्षांपूर्वी येथे पालिकेने शौचालय बांधले होते. मात्र पुढे स्टेशन परिसरात रस्तारुंदीकरण करण्यात आल्यावर हे शौचालय अर्धवट तोडण्यात आले. तेव्हापासून ते तसेच ठेवण्यात आले आहे.
तातडीचा अहवाल मागवणार
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तुंबलेले नदीचे पात्र व अर्धवट तोडण्यात आलेले शौचालय याबाबतचा तातडीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवण्यात येणार आहे. तुंबलेले नदीचे पात्र ताबडतोब स्वच्छ करून शौचालयाच्या उर्वरित जागेत लघुशंकेसाठीच्या शौचालयाच्या कामास लवकर सुरुवात करण्यात येणार आहे.