
कळव्यात आरोग्य शिबिराला प्रतिसाद
कळवा, ता. ८ (बातमीदार) : कळव्यातील कर्मवीर नगीन शेठ साळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. सुदर्शन साळवी यांच्यातर्फे गेल्या सात वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कळवा परिसरातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, पोटाचा विकार सांध्यांचा विकार, दाताचे आरोग्य, केसांचे आरोग्य डोळ्यांचे आरोग्य तसेच पूर्ण शरीर तपासणी व लहान मुलांचे आरोग्य, स्त्रिया तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य अशा अनेक आरोग्यविषयक बाबींचा समावेश आहे. याचा या परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेऊन सदर शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला आहे. रविवार (ता. ७) या आरोग्यदायी उपक्रमाला सात वर्षे पूर्ण झाल्याने मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. या विशेष शिबिरात लायन्स क्लब ऑफ ठाणे अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. वाविकर हॉस्पिटल यांच्या डॉक्टर पथकाने मोफत नेत्रतपासणी करून त्यातील १५ नागरिकांचे मोतिबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले. तसेच २० ते २२ लोकांचे मोतिबिंदू ऑपरेशन करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच शिबिरात ५०० लोकांनी आपली तपासणी करून घेतली.