
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. त्यात दिवसाकाठी रुग्णांची संख्या थेट १०० ते १५० च्या घरात पोहोचली होती. त्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा कोरोनाची चिंता वाढू लागली होती. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात येत आहे. आता दररोज ३० ते ६० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने ठाणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांपासून आटोक्यात असल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत होते. त्यात मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. अचानकपणे रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या होत्या. त्यात बुस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी धाव घेतल्याचे चित्रदेखील या वेळी दिसून आले.
ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन १०० ते १५० रुग्ण आढळून येत होते; तर या आजाराने एक ते दोन जणांचे मृत्यूदेखील होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांच्या मनात कोरोना या आजाराविषयी पुन्हा भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. अनेकांनी मास्क परिधान करून गर्दीच्या ठिकाणी जाणे पसंत केले होते. अशातच दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट होऊन रुग्णसंख्या ३० ते ६० च्या घरात येऊन पोहोचली आहे. त्यात जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७२० इतकी होती. या संख्येत घट होऊन ती ३०० च्या आसपास आली; तर ठाणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या १११, तर नवी मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ९६ इतकी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.