
आरटीओ कार्यालयांचे कामकाज अर्धा दिवस ठप्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता. ८) सकाळच्या सत्रात कर्मचाऱ्यांनी निदर्शनांसह लेखणी बंद आंदोलन केले. राज्यातील ५० कार्यालयांतही आंदोलन करण्यात आले. परिणामी दुपारपर्यंत आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. कर्मचारी नसल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळावे लागले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार बंधनकारक करण्यात आलेल्या आकृतिबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास २०१६ मध्ये सादर केला होता. नंतर आकृतिबंधास शासन स्तरावर मान्यतेसाठी सहा वर्षे मोठा लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा निर्णय २३ सप्टेंबर २०२३ रोजी निर्गमित झाला. त्यास सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही त्याची रितसर अंमलबजावणी झालेली नाही. पात्र असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सर्व राज्यांत कामकाजात सुसूत्रता नसल्याने संघटनेच्या आग्रही मागणीनंतर स्थापन झालेल्या समितीच्या अहवालाचा अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना (महाराष्ट्र)च्या वतीने सोमवारी मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयासह राज्यातील ५० कार्यालयांत आंदोलन केले.
...तर संघर्षाशिवाय पर्याय नाही
मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर सरकारने कार्यवाही करावी, असे झाले नाही तर तीव्र संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिला आहे.