
एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या होणार वेतन!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी राज्य सरकारने १२० कोटी रुपये; तर सवलत मुल्यापोटी २३१ कोटी रुपये असे तब्बल ३५१ कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. १०) एप्रिल महिन्याचे वेतन मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
कोरोना महामारीपासून एसटीची प्रवासी संख्या कमालीची घटल्याने एसटी महामंडळाचा तोटा अडीच हजार कोटींच्या घरात गेला आहे. याशिवाय प्रवासी कमी झाल्याने एसटीच्या महसुलात घट झाली असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या वेतनासाठी राज्य सराकरकडून आर्थिक मदत दिली जात आहे. हा निधी निश्चित तारखेला मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना कधीही महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आता सरकारने एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी १२० कोटी रुपये आणि सरकारने जाहीर केलेल्या सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी २३१ कोटी रुपये देण्यासाठी शासनाने निर्णय काढला आहे. ही रक्कम मंगळवारी (ता. ९) महामंडळाच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी वेतनाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्याने दिली.