जलवाहिनीचे काम लांबले

जलवाहिनीचे काम लांबले

कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील न्यू लिंक रोडवर भूमिगत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम गेले दोन महिने सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होऊन, प्रवाशांसह वाहनचालक हैराण झाले आहेत. अनेकदा येथे किरकोळ अपघात आणि वाद होत आहेत. सिग्नल चौकातच लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड्समुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्‍याचे वाहनचालकांचे म्‍हणणे असून हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कांदिवली पश्चिम येथील कांदिवली मेट्रो स्टेशन, एकता नगर सिग्नल चौकात गेले दोन महिने खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकांसह प्रवासी आणि स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. येथे नव्याने भूमिगत १२०० एमएमची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला अन्य जलवाहिनी जोडून महावीर नगर विभागाला देण्यात आली आहे. यासाठी लिंक रोडच्या दुतर्फा काँक्रीट रस्ता, दुभाजक तोडून काम करण्यात आले. लिंकरोडवर जोडणी जवळ पाण्याचा व्हॉल्व बसवून टाकी बांधण्यात आली आहे. बाजूला चिखल माती, रेतीचे ढिगारे साचले आहेत. अर्ध्याहून अधिक मार्गावर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. यामुळे बोरिवलीकडे जाणारा मार्गावरील सिग्नल चौकात, सिग्नल मिळताच वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गावरून पुढे मार्गक्रमण करतात तसेच डावीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहने दिसत नसल्याने कित्येक किरकोळ अपघात आणि वाद होतात. यामुळे सिग्नल मिळताच वाहतुकीचा बोजवारा उडतो. वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

न्यू लिंक रोडवर काम सुरू असल्याने बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भूमिगत काम पूर्ण झाले आहे. चार पाच दिवसांत मार्ग वाहतुकीस पूर्णपणे खुला होईल.
- सहायक अभियंता, जलकामे विभाग

लिंक रोड, काँक्रीट, खोदकाम आणि भूमिगत जलवाहिनीचे काम यामध्ये सुसूत्रता नसल्याने काम लांबले आहे. त्याचा नाहक त्रास गेले दोन महिने वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- योगेश घरत, उपविभाग अध्यक्ष, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com