रिक्षाचालकांच्या शिरजोरीला अभय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांच्या शिरजोरीला अभय
रिक्षाचालकांच्या शिरजोरीला अभय

रिक्षाचालकांच्या शिरजोरीला अभय

sakal_logo
By

वाशी, ता.९ (बातमीदार)ः ऐरोली परिसरात राष्ट्रवादी आणि शिवसेना रिक्षा युनियनच्या बेकायदा रिक्षा थांब्यांमुळे वाहतुकीची नवी समस्या उभी राहिली आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने रिक्षा संघटनांनी मिळेल त्या चौकात तसेच रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा थांबे तयार केले असून वाहतूक पोलिसांनी देखील सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
ऐरोलीतील सेक्टर-२० मध्ये तब्बल १२ हून अधिक बेकायदा रिक्षा थांबे उभारले गेले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा ते ऐरोली दरम्यान जवळपास आठ ठिकाणी बेकायदा रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले आहे. तर नव्याने उभ्या राहणाऱ्या ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील पटनी रस्त्यावर देखील हीच अवस्था आहे. त्यामुळे ऐरोलीतून मुंबई आणि ठाण्यासाठी प्रवासी शेअर रिक्षा करणाऱ्या प्रवाशांना रिक्षाचालकांच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे.
-------------------------------
स्थानक परिसरात दोनच अधिकृत थांबे
स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिमेकडे फक्त दोनच रिक्षा थांबे अधिकृत आहेत. तर आगार परिसर, सेक्टर ५ मध्ये सहकार बाजार, पेट्रोल पंप सिग्नल, सेक्टर १७, दिवा सर्कल पूल, ऐरोली नाका तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील रेल्वे स्थानक, माइंड स्पेस, अक्षरा कंपनी या ठिकाणी असलेले थांबे विनापरवाना आहेत. त्यामुळे या बेकायदा रिक्षा थांब्यांवर कारवाई होत नसल्याने प्रवासी नाहक वेठीस धरले जात आहेत.
-------------------------------------
कारवाईकडे कानाडोळा
या थांब्यावर नवी मुंबईतील राजकीय पुढाऱ्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. पुढाऱ्यांच्याच आशीर्वादाने ठाणे-कळवा परिसरातील अनेक रिक्षाचालक जादा पैशाच्या प्रलोभनापोटी नियम डावलून रिक्षा चालवत आहे. अनेकदा मनमानी भाडे आकारणी करतात. तर काही रिक्षाचालक गणवेश विनाच व्यवसाय करत असल्याचे आढळूनही वाहतूक पोलिस कारवाईबाबत उदासीन आहेत.
-----------------------------------------
प्रवाशांकडून मनमानी भाडे वसुली
ऐरोली परिसरातील रिक्षाचालकांनी सीएनजीचे दरात वाढ होत असल्याचे कारण पुढे करत भाडेवाढ केली आहे. दहा रुपये असणारे भाडे आता १५ रुपयांपर्यत गेले आहे. मुकंद आयर्न कंपनी ते सेक्टर ५ परिसरात १५ रुपये असणारे भाडे वाढवून २५ रुपये आकारले जातेय तसेच ४ ते ५ प्रवासी घेऊन आरटीओच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे केले जात आहे.
़़ः---------------------------------------------
रिक्षा स्टँडला परवानगी ही पालिका, वाहतूक व आरटीओ यांच्या अहवालानंतर देण्यात येते. पण बेकायदापणे रिक्षा स्टँड उभे केले असल्यास त्याच्यावर पोलिस स्टेशनकडून कारवाई येते.
-हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
-------------------------------------------
वाहतूक नियमांचे रिक्षा चालकाकडून उल्लंघन झाल्यास त्यावर वाहतूक पोलिस कारवाई करतात. पण बेकायदेशीर रिक्षा स्टँड उभे असल्यास त्यावर वाहतूक पोलिस करवाई करत नाही.
-गोपाळ कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे