दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

आधार कार्ड नूतनीकरण शिबिर
जोगेश्वरी (बातमीदार) ः भारत सरकारच्‍या निर्देशानुसार ज्‍यांचे आधार कार्ड १० वर्षांपूर्वी काढलेले आहे. अशा नागरिकांसाठी नूतनीकरण शिबिराचे आयोजन सेवा दल तालुकाध्यक्ष व मुख्‍य संघटक गजानन लाड यांनी केले होते. शनिवारी (ता. ६) व रविवारी (ता. ७) जोगेश्‍वरी पूर्वेतील अंधेरी छाया एस. आर. ए. बिल्‍डिंग पोस्‍ट ऑफिसजवळ हे शिबिर घेण्‍यात आले. जोगेश्वरी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित या शिबिराला विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. या शिबिरात २७५ नागरिकांनी नाव नोंदणी केली होती व त्‍यातील १८५ नागरिकांच्या आधार कार्डचे नूतनीकरण करण्‍यात आले. मुंबई महिला उपाध्यक्ष सुलोचना कासुर्डे व रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत उगेवार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती. या वेळी काँग्रेस नेते सुनील कुमरे, रोफ सोफी, प्रवीण वाडेकर, कमल राजपुत आदी मान्यवर उपस्थित होते.

सम्यक सेवा संघाचे विविध कार्यक्रम
शिवडी (बातमीदार) ः भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांची संयुक्तिक जयंती शिवडीतील सम्यक सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. दरम्यान बुद्ध वंदना घेतल्यानंतर बौद्धचारी संतोष जाधव यांच्या देखरेखीखाली अतिशय शिस्तबद्ध वातावरणात बौद्ध धम्म दीक्षाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी विविध प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच महिलांच्या मनोरंजनाकरिता खेळ खेळुया पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच शनिवारी (ता. ६) लहान मोठ्यांसाठी विविध प्रकारच्या स्मरणशक्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे सम्यक सेवा संघ व तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

मुलुंडमध्ये अधल्या मधल्याची गोष्ट
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या कला विभागातर्फे रंगवेध निर्मित ‘अधल्या मधल्याची गोष्ट’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटकाची कथा मेघना पेठे यांची असून नेपथ्य आणि दिग्दर्शन विलास पगार यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत अनिकेत शहाणे असणार आहेत; तर पार्श्वसंगीत सुशील पेंढारी यांचे आहे. नाटकाचे सादरीकरण शनिवारी (ता. १३) संध्याकाळी ६. ३० वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये करण्यात येणार आहे. सुनीता देवधर यांनी या नाटकाची निर्मिती केली असून त्याला प्रवेश स्वेच्छा मूल्य आहे; तरी सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

वडाळा येथे संयुक्त जयंती महोत्सव
वडाळा (बातमीदार) ः समता मित्र मंडळाच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विविध सामाजिक उपक्रमांचे अयोजन करण्यात आले होते. त्यात गॅलेक्सी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर उपक्रम राबवण्यात आला. याला विभागातील नागरिकांनी उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, माजी नगरसेविका पुष्पा कोळी, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिर
चेंबूर (बातमीदार) ः चेंबूर येथील श्री पार्श्वचंद्र गुच्छ जैन संघ, श्री कच्छी जैन मंडळ, तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने मंडळ सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या वेळी भाजपच्या माजी नगरसेविका आशा मराठे, समाज सेवक सुभाष मराठे व श्री कच्छी जैन मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.