इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय शववाहिकेविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय शववाहिकेविना
इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय शववाहिकेविना

इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय शववाहिकेविना

sakal_logo
By

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून शववाहिका नसल्याचे समोर आले आहे. यामुळे बऱ्याच वेळा येथील मृतदेह रुग्णवाहिकेमधून नेले जात असल्याची माहिती मिळत आहे; तर रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल झाल्याच्या अनेक घटना या रुग्णालयात घडल्या आहेत.
शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय हे गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून या ठिकाणी राज्य शासनाकडून नागरिकांना आणि रुग्णांना रुग्णसेवा दिल्या जात आहेत. मात्र रुग्णालयातील व्यवस्थापन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील रुग्णांना अनेक समस्येला आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रुग्णालयात एकूण ७ रुग्णवाहिका असून त्यापैकी ४ रुग्णवाहिका गेल्या ४-५ वर्षांपासून खराब अवस्थेत आहेत; तर तीन रुग्णवाहिका कार्यरत असून त्यापैकी एक रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गेल्याची माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे. दोन रुग्णवाहिकांपैकी बऱ्याच वेळा एकही रुग्णवाहिका रुग्णालयातून न मिळाल्याने रुग्णांना रिक्षातून रुग्णालयापर्यंत जावे लागते. रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसून रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या खासगी संस्थेच्या रुग्णवाहिकेचा उपयोग करावा लागत आहे.
शासनाच्या रुग्णालयात रुग्णवाहिकेची अशी अवस्था असताना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून शववाहिका नसल्याचे उघडकीस आले आहे. भिवंडी शहरात रोजगाराच्या निमित्ताने राज्याबाहेरील अनेक लोक रोजगारासाठी शहरात आले आहेत. त्यापैकी काही आपल्या परिवारासह शहरात आहेत. त्यांच्या घरी कोणी मृत झाल्यास त्याचा मृतदेह विविध राज्यात रुग्णवाहिकेमधून नेल्याच्या घटना नियमित घडत आहेत; तर कोणी अपघातात मृत झाल्यास अथवा शहरातील रुग्ण आजाराने मृत झाल्यास त्याचा मृतदेहदेखील रुग्णवाहिकामधून घरी नेला जातो. तसेच अपघातातील मृतदेहदेखील रुग्णवाहिकेतून इंदिरा गांधी रुग्णालयात आणले जातात. या साठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाकडे अद्ययावत शववाहिका नाही. त्यामुळे रुग्णालयाला शववाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
....
‘शासनाने दोन शववाहिका द्याव्या’
कोरोना काळात मृतदेहांना स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा सर्रास वापर झाला. ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेले जातात त्याच रुग्णवाहिकेतून आजारी रुग्णांना नेले जात असल्याच्या घटना शहरात आणि इंदिरा गांधी रुग्णालयात घडत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून या गंभीर वस्तुस्थितीकडे शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष्य नाही. या घटनेची दखल घेत शहरातील नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयासाठी दोन शववाहिका राज्य शासनाने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

-----
आजारी रुग्णांना घेऊन जाण्यासाठी शासनाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या दोन रुग्णवाहिका असून एक रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आहे; मात्र मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे शववाहिका नाही.
- सीमा माने, कार्यालयीन अधीक्षक, इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी