
मिरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार?
मिरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार?
भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण
भाईंदर, ता.९ (बातमीदार): भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील विविध जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष पदांचा फेर आढावा घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभुमीवर मिरा भाईंदरमधील भाजपचे जिल्हाध्यक्षही बदल्ण्यात येणार का यावरुन शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपमध्ये असलेल्या गटाच्या राजकारणावरुन नवा जिल्हाध्यक्ष कोणत्या गटाचा असेल याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांवर मते व्यक्त केली जात आहेत.
आगामी निवडणुकांसाठी विविध जिल्ह्यातील जिल्ह्याध्यक्षांचा कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नुकतेच बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती, पक्षाची ताकद, जिल्हाध्यक्षांची कामगिरी आदीचा लेखाजोखा यावेळी घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे मिरा भाईंदरमधील पक्षाची कामगिरीचेही मुल्यमापन केले जाणार आहे. लवकरच या संदर्भात जिल्ह्याची जबाबदारी असलेल्यांकडून तसेच कार्यकारिणी सदस्यांकडून अहवाल मागवला जाणार आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये सध्या कार्यरत असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड रवी व्यास पदावर कायम रहाणार की त्यांच्या आगी अन्य कोणाची वर्णी लागणार यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
मिरा भाईंदर भाजपमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष ऍड रवी व्यास यांचे स्वतंत्र गट आहेत. प्रदेश पातळीवरुन दोन्ही गटात समेट करण्याचे भरपूर प्रयत्न झाले परंतू दिलजमाई करण्यात अद्याप यश आलेले नाही. रवी व्यास यांच्या जिल्हाधय्क्षपदी नियुक्तीवरुनच भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. मेहता गटाने व्यास यांना जिल्हाध्यक्ष म्हणून मनाने स्वीकारलेले नाही. माजी नगरसेवकांचा सर्वात मोठा गट मेहता यांच्यासोबत आहे शिवाय प्रदेश पातळीवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नरेंद्र मेहता घनिष्ट संबंध ठेवून आहेत. दुसरीकडे मेहता गटाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे रवी व्यास यांनी पक्षाची नव्याने बांधणी करुन बहुतांश नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. आमदार गीता जैन यांचीही त्यांना साथ मिळत आहे.
त्यामुळे पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पदासंदर्भात काय निर्णय घेतला जातो यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्सूकता लागून राहिली आहे. त्याचे पडसाद समाजमाध्यमांवर दिसून येत आहेत. दोन्ही गटाकडून यासंदर्भात मते व्यक्त केली जात आहे. व्यास गटाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यपद रवी व्यास यांच्याकडेच राहील असा विश्वास वाटत आहे तर मेहता गटाच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर अप्रत्यक्षपणे माजी उपमहापौर तसेच मेहता यांचे समर्थक हसमुख गेहलोत यांना जिल्हाध्यक्ष पदाचे दावेदार घोषित करुन टाकले आहे.