भाजीपाल्‍यालाही उन्हाच्या झळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाल्‍यालाही उन्हाच्या झळा
भाजीपाल्‍यालाही उन्हाच्या झळा

भाजीपाल्‍यालाही उन्हाच्या झळा

sakal_logo
By

पेण, ता. ९ (वार्ताहर) : तापमानातील वाढ त्‍यात अवकाळी पावसामुळे बाजारात भाज्‍यांची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्‍याचे दर कडाडले असून फरसबी, आल्‍याच्या किमती २०० रुपये किलो झाल्‍या आहेत, यामुळे बाजारहाट करताना सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
गेल्‍या महिन्यात भाज्यांचे भाव आवाक्‍यात होते, त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. भाज्यांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मुंबई वाशी, पुणे, नाशिक येथेच भाव वाढल्याने पेणच्या बाजारपेठेत येणाऱ्या भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. पेणच्या बाजारपेठेत आठ दहा दिवसांपूर्वी मटर, गवार, फ्लावर, वांगी, भेंडी, घेवडा, कारली, टोमॅटो, शिराला या भाज्यांच्या किमती साधारणपणे ६० ते ८० रुपये किलो होत्या, मात्र तापमान वाढीचा फटका बसल्‍याने बहुतांश भाज्‍यांनी शंभरी गाठली आहे. त्‍यामुळे रोजच्या जेवणाचा ताळमेळ बसवताना गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागते.

भाज्‍यांचे दर प्रतिकिलो रुपयांत

भाज्‍या एप्रिल मे
मटर - १२०- १६०
गवार ६० - ८०
भेंडी ५० - ८०
घेवडा १०० - १२०
फरसबी १२० - २००
कारले ५० - ६०
शेवगा ६० -९०
आले - १२० - २००

काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे, वातावरणात कमालीचा बदल होत असल्याने मुंबई किंवा पुण्यावरून येणाऱ्या भाज्यांच्या किंमत खूप वाढल्या आहेत. पेण बाजारपेठेत येणाऱ्या मुंबईच्या वाशी, पुणे एपीएमसीतील भाज्यांचे दर वाढले असून फरसबी, आल्‍यासह मटार, घेवड्याने शंभरी ओलांडली आहे. त्‍यामुळे ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.
सिरताज खान, भाजी विक्रेते, पेण

..................

बाजारातील आवक घटली
वाशी, ता.९ (बातमीदार) ः कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन घटते. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. मागणी जास्‍त आणि आवक कमी असल्‍याने भाज्‍यांची दरवाढ झाली आहे. भाव वाढल्याने जेवणातून कोथिंबीर गायब झाली आहे.
घाऊक बाजारात फरसबी, आलं, कोथिंबीर महागली असून फरसबी प्रतिकिलो ६० ते १२० रुपयांवर, तर आलं प्रतिकिलो १३५ रुपयांवर गेले आहे. एपीएमसी बाजारात सोमवारी अवघी ४८ क्विंटल फरसबी दाखल झाली आहे. फरसबीच्या दरात २० ते २५ टक्के दरवाढ झाली असून, आधी ६० ते ८० रुपयांवरून आता ६० ते १२० रुपयांनी विक्री होत आहे. तर बाराही महिने मागणी असलेल्या आल्‍याची आवकही घटली आहे. सध्या बाजारात फक्त ६९७ क्विंटल आले दाखल झाले असून, प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांनी मिळणारे आले आता ९० ते १३५ रुपयांनी विक्री होत आहे.

कोथिंबीरची जुडी ३० रुपयांना
एपीएमसी बाजारात नाशिक आणि पुण्यातील कोथिंबीर दाखल होते. सध्या नाशिक येथील कोथिंबीर कमी प्रमाणात दाखल होत आहे, त्यामुळे दरात वाढ झाली आहे. बाजारात कोथिंबीर आधी प्रति जुडी १५ ते २० रुपये होती, आता तिची किंमत २५ ते ३० रुपयांवर गेली आहे.
-----------------------------------------
फक्त ४५० गाड्यांची आवक
हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक होत असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याची आवक अधिक असते. जवळजवळ ६०० ते ६५० गाड्या दाखल होत होत्या. मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटली आहे. सद्यःस्थितीत बाजारात बाजारात ४०० ते ४५० गाड्याची आवक होत आहे.
-----------------------------------------

कडक उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस पडला असल्याने त्याचा फटका देखील भाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे.
- आनंदा बोऱ्हाडे, घाऊक व्यापारी, एपीएमसी