
एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १२) दुपारी १२ ते शनिवारी (ता. १३) दुपारी १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास काही काळाचा अवधी लागणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
एमआयडीसीकडून जलवाहिनी दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेतली आहेत. बारवी गुरुत्व वाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी शुक्रवारी दुपारी १२ ते शनिवारी दुपारी १२ या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी डोंबिवली औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे.