तीन महिन्यांत रुग्णांची गैरसोय टळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिन्यांत रुग्णांची गैरसोय टळणार
तीन महिन्यांत रुग्णांची गैरसोय टळणार

तीन महिन्यांत रुग्णांची गैरसोय टळणार

sakal_logo
By

नायर एमआरआय मशीनचा प्रश्न मार्गी लागणार
तीन महिन्यांत रुग्णांची गैरसोय टळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या एमआरआय मशीनचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. पुढच्या तीन महिन्यांत रुग्णालयात नवीन एमआरआय मशीन उपलब्ध होणार असून रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नायर रुग्णालयातील एमआरआय लागणाऱ्या रुग्णांना चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मोठी गैरसोय होते. तसेच, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ही सात ते आठ दिवस एमआरआयसाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, ही मशीन लवकर उपलब्ध झाल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास नायर रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
नव्या मशीनचे डेमोनस्ट्रेशन झाले आहे. केईएम आणि नायर रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागप्रमुखांनी या मशीनची पडताळणी केली आहे. ही नवीन मशीन अत्याधुनिक असून सर्व इन्स्टॉलेशन काम लवकरच सुरू होईल. या मशीनचे वजन जवळपास टनमध्ये असल्याकारणाने इतर तांत्रिक बाबीही कराव्या लागणार आहेत. सिव्हिल वर्क, इलेक्ट्रिक वर्क, प्लम्बिंग वर्क सुरू होईल. त्यापूर्वी या मशीनची खरेदीची प्रक्रिया सुरू झाली, की या मशीनचे इतर काम सुरू होईल.

नायरच्या एमआरआय मशीनच्या खरेदी प्रक्रियेची ऑर्डर लवकरच काढली जाईल. यासोबत सिटीस्कॅन मशीन ही नवीन येईल. २०१८ पासून नवीन एमआरआय मशीनसाठी प्रक्रिया आणि पाठपुरावा सुरू आहे. जुन्या एमआरआय मशीनचा कालावधी ही संपला आहे. एका वर्षापूर्वी त्यासंबधित पत्र ही देण्यात आले होते. नवीन मशीनमध्ये एमआरआयचे रुग्ण घेण्यासाठी जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लागेल.
- डॉ. देविदास शेट्टी, रेडिओलॉजी विभागप्रमुख, नायर रुग्णालय

किमान दोन मशीनची गरज
नायर रुग्णालयाच्या रुग्णांचा भार बघता किमान दोन मशीनची गरज भविष्यात लागणार आहे. सायन आणि केईएम रुग्णालयात दोन मशीन सध्या कार्यरत आहेत; पण नायर रुग्णालयात एकच मशीन उपलब्ध असल्याने येथेही दोन मशीन उपलब्ध व्हायला पाहिजे, असे मत तज्‍ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. दुसऱ्या मशीनसाठी जागा पाहिली गेली आहे. दोन मशीन असल्या, तर ओपीडीत येणाऱ्या रुग्णांचे किमान दहा ते १५ दिवसांत एमआरआय होऊ शकेल आणि रुग्णालयात उपचाराधीन दाखल रुग्णांचे किमान दोन दिवसांत एमआरआय केला जाऊ शकतो. त्यामुळे, रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होईल.

पदभरती गरजेची
खास प्रशिक्षणार्थी कर्मचारीवर्ग एमआरआयसाठी उपलब्ध व्हायला हवा, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव २०१८ ला पाठवण्यात आला होता. एमआरआयमध्ये मॅग्नेट असल्याकारणाने ही मशीन हाताळण्याठी विशिष्ट प्रशिक्षित टेक्निशियन, वॉर्ड बॉय, परिचारिकांची गरज आहे. तीन पाळ्यांमध्ये ७ परिचारिका, ४ वॉर्ड बॉय आणि ३ तांत्रिकांची गरज असून याकडे पालिकेने अद्याप दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.