महामार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू

महामार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू

रोहा, ता. ९ (बातमीदार) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकीला मागच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात समोर उभ्या असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला; तर धडक देणाऱ्या वाहनाच्या चालकासह चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळील पळस गावाच्या हद्दीत घडला. प्रेमजित गजानन काकडे (वय ३४, रा. बेलपाडा, खारघर-नवी मुंबई) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
अपघाताविषयी समजलेली माहिती अशी, अकबर सकवारे हा आपल्या ताब्यातील चारचाकी मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळकडून नागोठणेकडे भरधाव घेऊन येत होता. नागोठणेजवळील पळस गावच्या हद्दीत आल्यानंतर चालक अकबर सकवारे याचे चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की समोर उभी असलेली गाडी आणि चालकाला धडक देत रस्त्याच्या बाजूला खाली उतरली. या वेळी आपली गाडी थांबवून रस्त्याकडेला उभा असलेला चालक प्रेमजित काकडे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अकबर सकवारे याच्यासह प्रवास करणारे हिना शकील शेख (वय २३), शाहीन शेख (वय ११), मदिया सकवारे (वय २३), साबीया मुल्ला(वय ६०) आदी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन सर्व जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना तातडीने पनवेल येथे पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com