
मोबाईल चोरटा चार तासांत अटक
डोंबिवली, ता. ९ : रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लांबवणाऱ्या एका चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार तासांतच अटक केली. दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने यापूर्वीदेखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याचा तपास करण्यात येत आहे. उल्हासनगर येथे राहणारा प्रवासी सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या भावाला पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये बसवून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आला होता. एक्स्प्रेस आल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. तक्रारदाराने भावाचे सामान घेऊन एक्स्प्रेसमध्ये ठेवले. त्यानंतर खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने या प्रवाशाच्या खिशातला मोबाईल लांबवला. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासांत दीपक पवार या चोरट्याला पोलिसांनी अटक केली.