
भूमी अभिलेख कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव
श्रीवर्धन, ता. १० (बातमीदार)ः मनुष्यबळाचा अभाव, गावांची वाढती लोकसंख्या, विस्तारीकरणामुळे तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामाची गती मंदावली आहे. नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामुळे आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या बाजूला भूमी अभिलेख कार्यालय आहे. कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची कामे रखडली असून कार्यरत कर्मचाऱ्यांना नित्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कार्यालयासाठी १७ कर्मचारी संख्या मंजूर असताना प्रत्यक्षात एक उपअधीक्षक अधिकारी व दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. तर पेण येथील उपअधीक्षककडे या कार्यालयाचा अतिरिक्त भर दिला आहे. दोन कर्मचारी तालुक्यातील ७८ गावांचा कारभार सांभाळत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील तब्बल चौदा पदे रिक्त आहेत. त्यामुळे शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.
नागरिक आपली कामे घेउन भूमी अभिलेख कार्यालयात येतात. पण अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी बाहेर गेल्याने त्यांना हेलपाटा वाया जातो.
भूमी अभिलेख कार्यालयातूनच शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भूसंपादन मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी, खरेदी विक्री, वारस वाटणी नोंदी व त्या बाबतचे दाखले,नमुने देण्याचे काम केले जाते.
साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची असे मोजणीचे प्रकार असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयातील कामे दिवसेंदिवस प्रलंबित राहत आहेत. अति तातडीच्या मोजणीलाही दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे तर साध्या मोजणीला एक वर्ष किंवा त्याहून जादा कालावधी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे. जमीन मोजणीच्या कामाचा निपटारा या कार्यालयातून होतो. याशिवाय प्रॉपर्टी कार्ड, बॅंक बोजा, बॅंक प्रकरण, वारस नोंद, खरेदी नोंद यासह विविध कागदपत्रे नागरिकांना अपेक्षित असतात, मात्र त्यासाठी त्यांना हेलफाटे मारावे लागतात. त्यामुळे कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरून दैनंदिन कामे मार्गी लागावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनुष्यबळाची कमतरता असल्याचे वरिष्ठ कार्यालयात कळवले असून अधिक कर्मचारी मागवण्याबाबत कळवले आहे, याबाबत पाठपुरावाही सुरू आहे. नागरिकांची प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे.
- हिरालाल मोरे, उपअधीक्षक
माझ्या जमिनीच्या आकारफोडसाठी दीड वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारले, आता कुठे काम पुढे सरकले आहे, मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेत मनुष्यबळ वाढवून प्रशासनाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
- सुरेश पेरवे, शेतकरी, वडवली