दुचाकी चोरणारे त्रिकुट जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरणारे त्रिकुट जेरबंद
दुचाकी चोरणारे त्रिकुट जेरबंद

दुचाकी चोरणारे त्रिकुट जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या महागड्या दुचाकींची चोरी करून त्याची सातारा भागात विक्री करणाऱ्या त्रिकुटाला नेरूळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. या त्रिकुटाने नेरूळ भागातून २० मोटारसायकल चोरल्याचे तपासात उघडकीस आले असून गुह्यातील चोरीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात नेरूळ पोलिसांना यश आले आहे.
नेरूळ पोलिसांनी अटक केलेल्या गौरव कदम (१९), निमेश कांबळे (२१) आणि प्रथमेश सपकाळ (२१) या तिघांनी रस्त्यालगत पार्क केलेल्या बुलेट, तसेच पल्सरसारख्या महागड्या गाड्या चोरी केल्या होत्या. यातील गौरव कदम हा सराईत चोरटा असून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली होती. यावेळी चोरण्यात आलेली दुचाकी त्याचे इतर मित्र सातारा भागात विकून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करत होते. या त्रिकुटाने नेरूळ भागातून अशा अनेक दुचाकी चोरून सातारासह विविध भागांत विकल्या होत्या. त्यामुळे नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. अखेर नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून शिरवणे भागात राहणाऱ्या गौरव कदम याला अटक केली होती.
--------------------------------------
अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागाची शक्यता
गौरव कदम याने साथीदार निमेश आणि प्रथमेश याच्यासह मिळून नेरूळ भागातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव व त्याचे मित्र निमेश आणि प्रथमेश या तिघांना अटक करून त्यांनी चोरलेल्या व दुसऱ्या व्यक्तींना विकलेल्या २० दुचाकी विविध भागांतून हस्तगत केल्या. पोलिसांना या त्रिकुटाकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------------------------------------
या प्रकरणात अटक केलेल्या त्रिकुटाने नेरूळ भागातून चोरलेल्या एकूण २० लाख रुपये किमतीच्या २० मोटारसायकल हस्तगत करण्यात नेरूळ पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- विवेक पानसारे, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ -१