
ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे, ता. १० : पंडित फिरोज दस्तूर यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार (ता. ११) ते १४ मे दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता शिवानंद स्वामी आणि ७.३० वाजता सुलेखा भट यांच्या गाण्यांचा कार्यक्रम असणार आहे. शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ६ वाजता गीतकार भाग्येश मराठे आणि सायंकाळी ७.३० वाजता पंडित अशोक नाडगीर हे गायन करणार आहेत. डॉ. चैतन्य कुंटे हे संवादिनी वादन, तर ७.३० वाजता अश्विन दळवी हे सूरबहार वादन शनिवारी (ता. १३) सायंकाळी करणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोपाला रविवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता गिराश संझगिरी आणि सायंकाळी ७.३० पंडित विद्याधर व्यास यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पं. मुकुंदराज देव, पं. गिरीश नलावडे, पं. महेश कानोले, रोहित देव हे तबला वादन करणार आहेत. तसेच पं. प्रभाकर पांडव, पं. अनंत जोशी, पं. अतुल फडके, पं. सिद्धेस बिचोलकर हे संवादिनी वादन करणार आहेत. पखवाज वादन पंडित मृणाल उपाध्याय या करणार आहेत. हा कार्यक्रम ठाण्यातील घंटाळी रस्ता येथील सहयोग मंदिर हॉलमध्ये रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.