
खतबियाणे वेळेवर मिळणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक मंगळवारी (ता. ९) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोचवण्यासाठी आणि मदत देण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलावीत. विभागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. खते, बी-बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाने प्रयत्न करावेत. कोकणातील जमिनीची उपलब्धता पाहून शेतीसाठी पाणी साठवण्यासाठी जलकुंभासारखे नावीन्यपूर्ण योजना राबवण्यासंदर्भात विचार व्हावा. खरीप हंगामात खतांचा व बी-बियाणांचा पुरेसा पुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. खतांचा गैरवापर रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कोकण विभागात आंबा, काजू, भात या पिकांसह इतर पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पहिलीपासून कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचेही सत्तार यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले.
उत्पादन क्षमतेवर भर द्यावा!
खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांना प्राधान्य द्यावे. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नाचणी, नागली व वरई या तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. नॅनो युरियाच्या वापरावर भर द्यावा. सेंद्रीय शेती व कमीत कमी खत वापरणारे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यावा. हापूस आंब्यांच्या संदर्भात सध्या अनेक ठिकाणी नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना करावी, असे कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले म्हणाले.