
निकनेतील अवैध गौण खनिज उत्खननाला नोटीस
कासा, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. डहाणू तालुक्यातील निकने गावात विनापरवाना या गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर अनधिकृत उत्खनन आढळून आल्याने तहसीलदारांनी नोटीस बजावली.
चारोटी मंडळ अधिकारी यांनी निकने गावात जाऊन पाहणी केली असता माँटो कार्लो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे उत्खननाचे काम सुरू केले होते; पण या जागेसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत माती, रेती, दगड, खडी यांचा भराव करण्यासाठी उत्खनन व वाहतूक केले जात असल्याचे मंडळ अधिकारी यांनी तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले. अवैध गौण खनिज साठा अंदाजे २५१२ ब्रास असल्याबाबत सांगण्यात आहे. मात्र त्यासाठी गौण खनिज परवाना घेणे जरुरीचे होते. कोणताही परवाना नसल्याने सात दिवसांत लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे; अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.