डोंबिवलीतील त्या इमारतीवर पोलिस बंदोबस्तात कारवाई

डोंबिवलीतील त्या इमारतीवर पोलिस बंदोबस्तात कारवाई

सकाळ इम्पॅक्ट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवली पूर्वेतील गावदेवी मंदिराजवळील बगिचाचे आरक्षण असलेल्या जागेत बेकायदा सात मजली इमारत उभी राहिली आहे. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत पालिका अधिकारी या इमारतीवरील कारवाई सातत्याने पुढे ढकलत होते. याविषयी ‘सकाळ’ने अनधिकृत बांधकामांविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे. अखेर बुधवारी पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात या बेकायदा इमारतीवर कारवाई सुरू केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. यात इमारतीचा केवळ काही भाग पाडून बांधकाम तसेच सोडले जाते. त्यानंतर पुन्हा इमारतीचे बांधकाम करून व्यावसायिक त्या इमारतीतील घरांची विक्री करत आहेत. अनधिकृत बांधकाम कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली असली तरी काही ठराविक बांधकामे पाडली जातात, तर काही इमारतींना मात्र अभय दिले जाते. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी ‘सकाळ’ने सातत्याने आवाज उठविला आहे. अशात पूर्वेतील गावदेवी येथील इमारतीवरील कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण अधिकारी देत होते. याबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी या इमारतीवर कारवाई करण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी पालिका प्रशासनाने इमारतीवर कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलिसांना विचारणा केली असता अखेर पोलिस बंदोबस्त मिळाला. त्यानुसार सकाळी ११ च्या दरम्यान टिळकनगर पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, सुहास गुप्ते, भारत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २५ कामगार, ८ ब्रेकर, कटर, पोकलेन, जेसीबी यांच्या साह्याने इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे.
.....

पोलिस बंदोबस्त मिळताच गावदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात येत आहे.
- भरत पाटील, प्रभाग क्षेत्र अधिकारी
....
आरक्षित जागांवर असलेल्या बेकायदा बांधकामांवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी. ज्या बांधकामांवर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करेल त्या त्या बांधकामांविरोधात मी न्यायालयात याचिका दाखल करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
- संदीप पाटील, वास्तुविशारद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com