नवी मुंबईत महिला सहायता केंद्र

नवी मुंबईत महिला सहायता केंद्र

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला साह्य कक्ष सुरू करण्यात आला आहे. या महिला साह्य कक्षाचे, तसेच नेरूळ सेक्टर-७ मधील ‘सावली सेंटर’मधील महिला सुरक्षा प्रकल्प व त्याच ठिकाणी सुरू केलेल्या स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (ता. ११) दुपारी होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबईत महिलांची छेड काढणे, लैंगिक छळ अथवा विनयभंग यांसारख्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्याशिवाय वैवाहिक संबंध व कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, पती व नातेवाईक यांच्याकडून होणाऱ्या छळाची प्रकरणे वाढली आहेत. अशा प्रकरणात महिलांच्या समस्या समजून घेणे, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य न्याय देण्याच्या उद्देशाने प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘महिला साह्य कक्ष’ सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी महिला व मुलींना निःसंकोच तक्रार करता येणार आहे. महिलांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी २४ तास महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

महिलांसाठी निर्भया पथक
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने महिलांच्या आपत्कालीन मदतीसाठी ‘निर्भया पथक’ तयार करण्यात आले आहे. महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात २४ तास हे निर्भया पथक कार्यान्वित राहणार आहे. महिला निर्भया पथक कार अथवा स्कुटीवरून तत्काळ घटनास्थळी पोहोचून पीडितांना हवी असलेली मदत उपलब्ध करून देणार आहेत. या निर्भया पथक वाहनांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

‘सावली सेंटर’मध्ये महिला सुरक्षा प्रकल्प
नेरूळमधील ‘सावली सेंटर’मधील तळ मजल्यावर नवी मुंबई पोलिसांच्या वतीने महिला प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात असलेले महिला साह्य केंद्र या महिला सुरक्षा प्रकल्पात हलविण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तालयातच हे केंद्र चालवले जात होते. या केंद्रात समुपदेशनसाठी येणाऱ्या कुटुंबांच्या बैठकीसाठीही पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे नेरूळ येथील सावली सेंटरमध्ये स्वतंत्र जागेत महिला साह्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून आता अधिक तक्रार अर्ज निकाली काढण्यास गती मिळणार आहे.

स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे
भविष्यात सायबर गुन्ह्यांत होणारी वाढ लक्षात घेऊन त्यासंबंधित गुन्हे हाताळण्यासाठी, तसेच सदर गुन्ह्यांचा तपास तत्काळ करून सायबर गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या सायबर सेलचे सायबर पोलिस ठाण्यात रूपांतर करण्यात आले आहे. नेरूळ सेक्टर-७ मधील सावली सेंटर येथील पहिल्या मजल्यावर हे सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com