खरीपाची पेरणी एक लाख हेक्टरवर

खरीपाची पेरणी एक लाख हेक्टरवर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १० : जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. खते, बी-बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. उपलब्ध साधनांचा वापर करून जिल्ह्यातील एकूण लागवड खालील क्षेत्राची खरीप हंगामातील उत्पादकता वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण एक लाख १४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात केले आहे. जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न वाढावे, तसेच दुबार पेरणीच्या क्षेत्रातही वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र भात पिकाचे आहे. त्या खालोखाल ७, १२८ हेक्टरवर नागली, ९७५ हेक्टर इतर तृणधान्य, ९०६ हेक्टर तूर, १७३ हेक्टर इतर कडधान्य याप्रमाणे नियोजन आहे. खरिपाचा नियोजन आराखडा तयार करताना येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशा सूचना कृषीमंत्री अब्दुल सत्तार संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोकणातील खरीप हंगामापूर्वी तयारीसाठी ठाणे येथे मंगळवारी आढावा बैठक झाली, यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. खते, बी-बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाने प्रयत्न करावेत. कोकणातील जमिनीची उपलब्धता पाहून शेतीसाठीच्या पाणी साठविण्यासाठी जलकुंभासारखे नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासंदर्भात विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


खरीपासाठी प्रशासनाची सज्जता
जिल्ह्यात २४ हजार ६०० मेट्रिक टन इतक्या रासायनिक खतांची आवश्यकता असून त्याप्रमाणे मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच ३४ हजार ९०० लिटर्स किटकनाशके व बुरशी नाशकांची आवश्यकता आहे. तर भाताचे बियाण्याची आवश्यकता १५ हजार १५५ क्विंटल इतकी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली आहे.

भरारी पथकांची स्थापना
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर २ तर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात यासाठी उत्पादन व साठवणूक स्थळावर नमुने घेऊन तपासणी करण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. सदोष नमुने आढळल्यास ते जप्त करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील कृषी विषयक माहिती
भौगोलिक क्षेत्र - ६ लाख ८६ हजार ८९२ हेक्टर
पेरणीखाली - २ लाख १ हजार ३२२ हेक्टर
खरीपाचे क्षेत्र - १ लाख ४१ हजार २०० हेक्टर
रब्बीचे क्षेत्र - २१ हजार १०० हेक्टर


नाचणी, नागली व वरई या तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. नॅनो युरियाच्या वापरावर भर द्यावा. सेंद्रीय शेती व कमीत कमी खत वापरणारे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. हापूस आंब्यांच्या संदर्भात सध्या अनेक ठिकाणी नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना करावी.
- अब्दुल सत्तार, कृषी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com