
४० रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव
विक्रमी कामगिरीबद्दल
४० रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव
मुंबई, ता. १० : विनातिकीट प्रवाशांकडून २३५ कोटींचा दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने साध्य केले आहे. मध्य रेल्वेने ३०३.९१ कोटींचा दंड वसूल केल्याने ३५ तिकीट तपासनिस आणि पाच रेल्वे कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. ३०० कोटींचा टप्पा पार करणारी मध्य रेल्वे देशातील पहिली क्षेत्रीय रेल्वे ठरली आहे.
मध्ये रेल्वेला २३५.३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करायचे होते. मात्र, त्यांनी ३०३.९१ कोटींचा तिकीटतपासणी महसूल मिळवत सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये प्रथम स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारी मध्ये रेल्वे पहिलीच ठरली आहे. मध्य रेल्वेकडे तिकीट तपासणीतून कोटी रुपये मिळविणारे सर्वाधिक कर्मचारी आहेत. दोन कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह एकूण २३ तिकीट तपासनिसांनी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. तिकीट निरीक्षक धर्मेंद्र कुमार सर्वाधिक कमाई करणारे कर्मचारी ठरले. सर्व विभागातील प्रत्येकी पाच सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने ८१.६६ कोटी रुपयांच्या रेल्वे बोर्डाच्या लक्ष्यानुरूप ८७.४४ कोटी रुपयांचा भाडेव्यतिरिक्त (नॉन फेअर) महसूल मिळवला.