मेट्रो तीनचा पहिला‍ टप्पा डिसेंबरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो तीनचा पहिला‍ टप्पा डिसेंबरमध्ये
मेट्रो तीनचा पहिला‍ टप्पा डिसेंबरमध्ये

मेट्रो तीनचा पहिला‍ टप्पा डिसेंबरमध्ये

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई मेट्रो तीनचे काम प्रगतिपथावर आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन आरे ते बीकेसी या मार्गावर मेट्रो धावेल, असा विश्‍वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने व्यक्‍त केला आहे. या पहिल्या मार्गावर मेट्रोच्या एकूण नऊ गाड्या धावणार असून दोन ट्रेनमधील कालावधीही कमीत कमी ठेवण्याचा मेट्रो रेल कोर्पोरेशनचा प्रयत्न आहे; तर ऑक्टोबर २०२३ पर्यंत कारडेपो सुरू करून कार्यान्वित करण्यासंदर्भातील सर्व चाचण्या सुरू असल्याचेही मुंबई मेट्रोने सांगितले.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मुंबई मेट्रो मार्ग-तीन मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी मेट्रो-तीन मार्गाची अंमलबजावणी होत आहे. वर्ष २०३१ मध्ये दररोज १७ लाख प्रवासी या मार्गावर प्रवास करतील. प्रत्येक मेट्रो गाडीत २५०० प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रत्येक गाडी ही तीन ते चार मिनिटांनी उपलब्ध असली, तरीही सदर मेट्रो गाड्या दर दोन मिनिटांच्या कालावधीत धावण्यास सक्षम आहेत, अशी माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे.

कामाची टक्‍केवारी
८ मेपर्यंत
८१.५ टक्‍के एकूण काम
९२.८ टक्‍के प्रकल्प बांधकाम
८९.८ टक्‍के स्‍थानकांचे बांधकाम
५०.९ टक्‍के प्रणालीची कामे
६१.१ टक्‍के रेल्वेरुळाचे काम
१०० टक्‍के भुयारी मार्गाचे काम
६३ टक्‍के कारडेपोचे बांधकाम

पहिल्या टप्प्याचे ८७.२ टक्के काम पूर्ण
पहिल्या टप्प्यात धावणाऱ्या आरे ते बीकेसी या मार्गात एकूण १० स्थानके असून नऊ भुयारी; तर एक जमिनीवर आहे. हे अंतर १२.४४ किमी असून दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे इतका असेल. या मार्गावर पहिल्या टप्प्यात ९ गाड्या धावतील. मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. ९७.८ टक्‍के प्रकल्प बांधकाम पूर्ण झाले असून एकूण ९३ टक्‍के स्थानक बांधकाम पूर्ण झाले आहे; तर एकूण ६५.१ टक्‍के प्रणालीची कामे पूर्ण झाले आहे.

मेट्रो-३ च्या गाड्या मुंबईत दाखल
आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत व अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून दिनांक १७/१८ मेपर्यंत सदर गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील. सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज असून २०५३ पर्यंत कारडेपोत ५५ गाड्यांची देखभाल करता येणे शक्य होणार आहे. आरे डेपोमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणावर काम केले जात असून डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामे, ओसीसी (ऑपरेशन कंट्रोल सेंटर), ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) सिस्टम, एमईपी (मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग) कामे, स्टॅबलिंग लाइन, ऑक्झिलरी सबस्टेशन, वॉश प्लांट, रेल्वे रूळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

ऑक्टोबरपर्यंत ट्रायल रन अपेक्षित
रेल्वेरुळाचे एकूण ८६.३ टक्‍के बांधकाम पूर्ण झाले आहे. या सेवेची चाचणी ऑक्टोबरपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) द्वारे मेट्रोची सुरक्षा चाचणी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मेट्रो ३ प्रकल्पाविषयी
- ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग
- एकूण २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी
- २०२४ पर्यंत मेट्रो-३च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील
- २०४१ पर्यंत मेट्रो-३मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट
- वर्ष २०४१पर्यंत प्रतिदिन ३.५४ लाख लिटर इंधनाचा वापर
- या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन सीओटू उत्सर्जन कमी होणार

दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये
मेट्रो तीन मार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील एकूण ७६.९ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९५.३ टक्‍के प्रकल्प बांधकाम; तर ८८.३ टक्‍के स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रणालीची ४२.४ टक्‍के कामे पूर्ण झाली आहेत; तर रेल्वेरुळाचे एकूण ४६.६ टक्‍के बांधकाम पूर्ण झालेले असून हा मार्ग जून २०२४ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो ३ सारख्या तांत्रिकदृष्ट्या कठीण प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान कॉर्पोरेशनचे अधिकारी लीलया पेलत आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो मार्गिका ३ सुरू करण्याचे नियोजित आहे. विधानभवन स्थानकाचे ८८ टक्‍के काम; तर चर्चगेट स्थानकाचे ८३ टक्‍के टकाम पूर्ण झाले आहे. मेट्रो ३ कार्यान्वित झाल्यावर ही दोन्ही स्थानके चाकरमान्यांसाठी वरदान ठरतील.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री