ग्रुप इन्शुरन्स व सॅशे इन्शुरन्स जरुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रुप इन्शुरन्स व सॅशे इन्शुरन्स जरुरी
ग्रुप इन्शुरन्स व सॅशे इन्शुरन्स जरुरी

ग्रुप इन्शुरन्स व सॅशे इन्शुरन्स जरुरी

sakal_logo
By

कृष्ण जोशी / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः सन २०४७ पर्यंत देशातील प्रत्येकाला विमा संरक्षण मिळावे हे ‘ईरडा’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रुप इन्शुरन्स किंवा छोट्या रकमेचे सॅशे इन्शुरन्स महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विमा हप्त्यांचा फार मोठा भार ग्राहकांवर पडणार नाही, असे मत एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्सचे चीफ डिस्ट्रीब्यूशन ऑफिसर अनूप सेठ यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले. एडलवाईस टोकियो लाईफ इन्शुरन्स ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी आयुर्विमा कंपनी आहे. सर्वोत्तम नवकल्पनांसाठी गोल्डन पीकॉक अवॉर्ड मिळालेली तसेच आतापर्यंत ईरडाने कधीही दंड, इशारा, ताकीद दिली नसलेली ही कंपनी आहे. तर बँका, वित्तसंस्था आदी पाचशे कंपन्यांमध्ये ग्रेट प्लेस टू वर्क हा किताब मिळालेली ही एकमेव कंपनी असल्याचेही सेठ म्हणाले.

आज भारतातील प्रत्येकाकडे विमा नाही. ज्यांच्याकडे आहे त्यातील सर्वांकडेही तो पुरेसा नाही. पूर्ण संरक्षणासाठी उत्पन्नाच्या दहापट विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. तसेच गृहकर्ज व अन्य देणी यांचा विचारही त्यात झाला पाहिजे, यादृष्टीने आपल्याकडे सुरक्षेची मोठीच कमतरता आहे. ज्या देशातील लोक असे सुरक्षित नसतात त्यांचा आत्मविश्वास आणि व्यवसाय-उद्योगधंदे याबाबतीत धोका घेण्याची त्यांची क्षमता नसते, असेही सेठ म्हणाले.

भारतात अजूनही विमा योजना तळागाळापर्यंत गेल्या नाहीत. त्यासाठी त्या परवडणाऱ्या झाल्या तरच उपयोग होईल. त्याकरिता ग्रुप इन्शुरन्स हा चांगला उपाय आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना असे ग्रुप इन्शुरन्स द्यावेतच. त्याखेरीज वैयक्तिकरित्या देखील कर्मचाऱ्यांना विमा घेण्यास कंपन्यांनी प्रोत्साहन द्यावे. विम्याचे हप्ते सर्वांना परवडावेत यासाठी सॅशे प्रकारच्या लहानशा इन्शुरन्सची गरज आहे. युरोप, अमेरिकेत अनेक ठिकाणी टॅक्सी सफरीसाठीही विमा असतो. आपल्याकडे जसा विमान किंवा रेल्वेच्या तिकिटातच विमा रक्कम असते, तसा बस प्रवासी, मॉलमधे जाणारे आदींनी हा विमा घ्यायला हवा. अशाप्रकारे अनेक विम्याची एकत्र मोळी केली तर त्याचा फटका ग्राहकाला बसणार नाही. किचकट फॉर्म किंवा क्लिष्ट योजना समजत बसायची वेळ ग्राहकावर येऊ नये. स्वस्त आणि पाच मिनिटात मिळू शकेल असा एक विमा आम्ही लवकरच आणत आहोत असेही ते म्हणाले.

अनेक विमा कंपन्या नव्याण्णव टक्के विमादावे दिल्याचा दावा करतात. मात्र हे क्लेम लहान रकमेचे दिले असले व फेटाळलेल्या एक टक्क्यांमध्ये मोठ्या रकमेचे विमा दावे असले तरी त्या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही. पण एडलवाईज टोकियोकडे दाव्यांच्या मंजूर केलेल्या रकमा, या मंजूर केलेल्या दाव्यांच्या संख्येपेक्षा नेहमीच मोठ्या असतात. आमच्याकडे कर्मचारी आणि वितरक यांना आम्ही समाधानी ठेवतो. असे झाले तरच ते ग्राहकांना समाधानी ठेवू शकतात. त्याचमुळे आम्हाला ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून गौरवण्यात आले, असेही सेठ म्हणाले.