
ठाण्यातून एक कोटी ६२ लाखांचे अमली पदार्थ जप्त
ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : शहर पोलिस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संयुक्त पथकात उपायुक्त गुन्हे शाखा पथक, ठाणे शहर गुन्हे पथक, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधी विभाग सहायक आयुक्त, अमली पदार्थविरोधी पथक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत गेल्या चार महिन्यांच्या तब्बल १३१ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून एक कोटी ६२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विक्री, वाहतूक आणि वापर करणाऱ्याच्या विरोधात धडक मोहीम राबवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आलेली होती. या समितीच्या बैठकीत कारवाईची रूपरेषा निश्चित करून धडक संयुक्त कारवाईची छापेमारी करण्यात आली. या चार महिन्याच्या कालावधीत १४ विविध धाडसत्रात २१ जणांना अटक संयुक्त पोलिस पथकाला यश आले; तर अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ११६ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती या समितीच्या बैठकीत देण्यात आली.